मारियुपोलची अवस्था पाहून हादरला ग्रीसचा अधिकारी
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याला 25 दिवस पूर्ण झाले आहेत. या 25 दिवसांमध्ये युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. कधी झगमगाटाने उजळून निघणारे मारियुपोल शहर तर पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. मारियुपोलमधून मायदेशी परतलेले ग्रीसचे मुत्सद्दी मॅनोलिस एंड्रोलाकिस यांनी या शहरातील उदध्वस्त स्थितीची माहिती दिली आहे.
मी तेथे जे पाहिले, ते कुणालाच पाहायला लागू नये अशी अपेक्षा कतो. मारियुपोल लवकरच अशा शहरांच्या यादीत सामील होईल, जी युद्धात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती असे एंड्रोलाकिस यांनी अथेन्स विमानतळावर बोलताना म्हटले आहे. एंड्रोलाकिस हे मारियुपोल शहरातून बाहेर पडणारे अखेरच युरोपीय मुत्सद्दी होते.
मारियुपोलला रशियाचा घेराव एक असा दहशतवाद आहे ज्याला आगामी शतकांपर्यंत आठवणीत ठेवले जाईल असे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी काढले आहेत. रशियाच्या सैनिकांनी 1 मार्च रोजी मारियुपोल शहराला वेढा घातला होता. तेव्हापासून दिवसेंदिवस शहराची स्थिती बिघडत चालली आहे.
इस्रायलला रक्षणाचे आवाहन ज्यू धर्मीय असणाऱया झेलेंस्की यांनी इस्रायलला युक्रेनियन ज्यूंचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलची क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा सर्वोत्तम असल्याचे प्रत्येक जण जाणून आहे. इस्रायल निश्चितपणे आमच्या लोकांची मदत करेल अशी अपेक्षा असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. झेलेंस्की यांच्या आवाहनानंतर इस्रायलचे विदेशमंत्री याइर लॅपिड यांनी युक्रेनला शक्य तितकी मदत करणार असल्याचे नमूद पेले आहे.