पुणे / प्रतिनिधी :
पुण्यातील काँग्रेस भवनची काल तोडफोड करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. मात्र कार्यालयाची तोडफोड करणारे माझे कार्यकर्ते नाहीत. व या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिले आहे. दरम्यान संग्राम थोपटे यांनी आज काँग्रेस भवनची पाहाणी केली. यावेळी माजी शहराध्यक्ष अभय छाजेडही उपस्थित होते.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस आमदार संग्राम थोपटे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. यातच काल पुण्यातील काँग्रेस भवनची काही लोकांनी तोडफोड केल्यानंतर थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनीच ही तोडफोड केल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र थोपटे यांनी ते कार्यकर्ते माझे नसून मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा दावा केला आहे.
तसेच माझ्या कार्यकर्त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तरीही या प्रकरणाची आम्ही गंभीर चौकशी करणार आहोत, असंही थोपटे यांनी यावेळी सांगितलं.