8 गडी राखून बाजी, मनीष पांडे-विजय शंकर यांची तिसऱया गडय़ासाठी 140 धावांची अभेद्य भागीदारी
वृत्तसंस्था/ दुबई
मनीष पांडे (47 चेंडूत 83) व विजय शंकर (51 चेंडूत 52) यांनी नाबाद अर्धशतके झळकावल्यानंतर सनरायजर्स हैदराबादने आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सचा एकतर्फी धुव्वा उडवला. प्रारंभी, राजस्थानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारता आली तर प्रत्युत्तरात पांडे व शंकर यांच्या फटकेबाजीमुळे हैदराबादने 18.1 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 155 धावांचे आव्हान असताना डेव्हिड वॉर्नर (4) व जॉनी बेअरस्टो (10) हे अव्वल फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाले आणि यामुळे हैदराबादची 2 बाद 16 अशी दैना उडाली. पण, त्यानंतर मनीष पांडे व विजय शंकर या ‘लोकल स्टार’ खेळाडूंनी तडाखेबंद फलंदाजी साकारत विजय सहजपणे खेचून आणला. या उभयतांनी राजस्थानच्या हरएक गोलंदाजाचा उत्तम समाचार घेताना चौकार-षटकारांची जणू आतषबाजीच केली. मनीष पांडेने 4 चौकार, 8 षटकार तर विजय शंकरने 6 चौकारांची बरसात केली.
राजस्थानला फलंदाजीत अपयश
तत्पूर्वी, हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सला निर्धारित 20 षटकात 6 बाद 154 धावांवर रोखले. राजस्थानतर्फे संजू सॅमसनने सर्वाधिक 36 तर बेन स्टोक्सने 30 धावांचे योगदान दिले. इतका अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला विशीच्या पुढे सरकता आले नाही.
सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सला या लढतीत प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. रॉबिन उत्थप्पाचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला. अस्तित्वात नसलेली एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावचीत झाला. होल्डरच्या गोलंदाजीवर स्टोक्सला बचावात्मक फटका खेळणे भाग पडले. पण, यावेळी उत्थप्पाने नसलेली धाव घेण्याचा आततायी प्रयत्न केला आणि होल्डरने यष्टीचा थेट वेध घेतल्यानंतर त्याची निराशा होणे साहजिक होते.
संजू सॅमसन होल्डरच्या स्लोअर ऑफकटरवर त्रिफळाचीत झाला. त्याने 26 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. सॅमसनच्या या खेळीत 3 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. स्क्वेअरच्या दिशेने आक्रमक फटका लगावण्याचा त्याचा प्रयत्न येथे चुकला होता.
अनुभवी इंग्लिश फलंदाज बेन स्टोक्सने 32 चेंडूत 30 धावा जमवल्या. पण, याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यापूर्वीच तो बाद झाला. स्टोक्सला यात बरेच झगडावे लागले. 30 धावांच्या खेळीत तो केवळ 2 चौकार फटकावू शकला. अंतिमतः रशीद खानने त्रिफळा उडवत त्याची खेळी संपुष्टात आणली. जोस बटलर मात्र किंचीतही प्रतिकार करु शकला नाही. त्याला विजय शंकरने बॅकवर्ड पॉईंटवरील नदीमकरवी झेलबाद केले. तो चौथ्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला. स्टीव्ह स्मिथ व रियान परागही विशीच्या घरातच बाद झाले. आश्चर्य म्हणजे या दोघांनाही होल्डरनेच तंबूचा रस्ता दाखवला होता.
कर्णधार स्टीव्ह स्मिथने 15 चेंडूत 2 चौकारांसह 19 धावा केल्या तर रियान परागने 12 चेंडूत 20 धावा जमवल्या. रियानच्या खेळीत 2 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. तळाच्या क्रमवारीत राहुल तेवातिया व जोफ्रा आर्चर नाबाद राहिले. तेवातियाने 3 चेंडूत 2 तर आर्चरने 7 चेंडूत 16 धावा केल्या. सनरायजर्सचा टी. नटराजन महागडा ठरला. त्याने 4 षटकात 46 धावा दिल्या.
धावफलक
राजस्थान रॉयल्स : रॉबिन उत्थप्पा धावचीत (होल्डर) 19 (13 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), बेन स्टोक्स त्रि. गो. रशीद खान 30 (32 चेंडूत 2 चौकार), संजू सॅमसन त्रि. गो. होल्डर 36 (26 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), जोस बटलर झे. नदीम, गो. शंकर 9 (12 चेंडू), स्टीव्ह स्मिथ झे. पांडे, गो. होल्डर 19 (15 चेंडूत 2 चौकार), रियान पराग झे. वॉर्नर, गो. होल्डर 20 (12 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), राहुल तेवातिया नाबाद 2 (3 चेंडू), जोफ्रा आर्चर नाबाद 16 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 3. एकूण 20 षटकात 6 बाद 154.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-30 (उत्थप्पा, 3.3), 2-86 (सॅमसन, 11.4), 3-86 (स्टोक्स, 12.1), 4-110 (बटलर, 15.3), 5-134 (स्मिथ, 18.1), 6-135 (रियान पराग, 18.2).
गोलंदाजी :
संदीप शर्मा 4-0-31-0, जेसॉन होल्डर 4-0-33-3, विजय शंकर 3-0-15-1, टी. नटराजन 4-0-46-0, रशीद खान 4-0-20-1, एस. नदीम 1-0-9-0.
सनराजयर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर झे. स्टोक्स, गो. आर्चर 4 (4 चेंडूत 1 चौकार), जॉनी बेअरस्टो त्रि. गो. आर्चर 10 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मनीष पांडे नाबाद 83 (47 चेंडूत 4 चौकार, 8 षटकार), विजय शंकर नाबाद 52 (51 चेंडूत 6 चौकार). अवांतर 7. एकूण 18.1 षटकात 2 बाद 156.
गडी बाद होण्याचा क्रम :
1-4 (वॉर्नर, 0.4), 2-16 (बेअरस्टो, 2.4).
गोलंदाजी :आर्चर 4-0-21-2, अंकित रजपूत 1-0-11-0, कार्तिक त्यागी 3.1-0-42-0, बेन स्टोक्स 2-0-24-0, श्रेयस गोपाल 4-0-32-0, राहुल तेवातिया 4-0-25-0.