मुंबईपेक्षा हैदराबादकडे ओढा अधिक : रोजची तिन्ही विमाने फुल्ल
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावहून हैदराबादला विमान प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. दररोज 3 विमाने बेळगाव-हैदराबाद व हैदराबाद-बेळगाव असा प्रवास करीत आहेत. ही सर्व विमाने 90 टक्के भरून जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मुंबईपेक्षाही हैदराबादच्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्यात एकूण बेळगाव विमानतळावरून प्रवास केलेल्या प्रवाशांमध्ये बेंगळूर नंतर हैदराबादला पसंती दिली आहे. बेळगाववरून हैदराबादला 3 हजार 553 प्रवासी गेले तर 3 हजार 343 प्रवासी विमानाने परतल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. तसेच मुंबईला 3 हजार 188 प्रवासी गेले तर 3 हजार 205 प्रवासी बेळगावमध्ये आल्याची नोंद आहे. जानेवारी महिन्यापासून ट्रुजेटनेही बेळगाव-हैदराबाद सुविधा सुरू केल्यामुळे या संख्येत वाढ होणार आहे.
हैदराबाद येथे आयटी कंपन्या असल्यामुळे बेळगावमधील अनेक अभियंते तेथे कामानिमित्त जात असतात. तसेच अनेकजण तेथील मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कामाला आहेत. तसेच हैदराबाद ही एक व्यापारी पेठ असल्यामुळे व्यवसायासाठी येणाऱया व जाणाऱयांची संख्या मोठी आहे. पर्यटनासाठीही हैदराबाद एक उत्तम पर्याय असल्यामुळे पर्यटनास्थळांला जाणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे बेळगाव-हैदराबाद सेवेला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.
अशी आहे बेळगाव-हैदराबाद सेवा
बेळगाववरून हैदराबादला दररोज तीन कंपन्या सेवा देतात. इंडिगो – सायं. 5.15 (बेळगाव) – सायं. 6.40 वा. (हैदराबाद), दुपारी 3.35 (हैदराबाद) – 4.55 (बेळगाव) पोहचते. स्पाईस जेट- (बेळगाव) सायंकाळी 5.55 – (हैदराबाद) सायंकाळी 7.20, (हैदराबाद) – दुपारी 4.10 – बेळगाव 5.35. ट्रुजेट बेळगाव दुपारी 1 वा. – हैदराबाद दुपारी 2.25, हैदराबाद सायंकाळी 4 बेळगाव सायं. 5.25 मि. पोहोचते.