एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब, साहा-वॉर्नर-पांडेची चौफेर फटकेबाजी
दुबई/ वृत्तसंस्था
वृद्धिमान साहा (45 चेंडूत 87), डेव्हिड वॉर्नर (34 चेंडूत 66) व मनीष पांडे (31 चेंडूत नाबाद 44) या त्रिकुटाची धुवांधार फलंदाजी आणि रशीद खानचा (7 धावात 3 बळी) भेदक मारा, यामुळे सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वपूर्ण आयपीएल साखळी सामन्यात 88 धावांनी सहज फडशा पाडला. प्रारंभी, हैदराबादने 20 षटकात 2 बाद 219 धावांचा मोठा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात दिल्लीला विजयाच्या आसपासही फिरकता आले नाही. 19 षटकात सर्वबाद 131 धावांवर त्यांचा डाव आटोपला.
विजयासाठी 220 धावांचे कठीण आव्हान असताना दिल्लीच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर ठाण मांडून धावांची आतषबाजी करता आली नाही. ऋषभ पंतने 35 चेंडूत 36 धावा केल्या, हाच दिल्लीतर्फे थोडाफार प्रतिकार ठरला. रहाणे 26 तर हेतमेयर 16 धावांवर बाद झाले. हैदराबादचा फिरकी गोलंदाज रशीद खानने 4 षटकात 7 धावात 3 बळी, अशी अविश्वसनीय गोलंदाजी नोंदवली.
या हंगामात पहिल्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक 77 धावांचा विक्रम सनरायजर्स हैदराबादने येथील लढतीत नोंदवला. वॉर्नर व साहा या जोडीने फलंदाजीला उतरल्यानंतर पहिल्या चेंडूपासूनच आक्रमणावर भर दिला होता. त्यांनी 9.4 षटकातच 107 धावांची झंझावाती सलामी दिली. वॉर्नरने 8 चौकार, 2 षटकार, साहाने 12 चौकार, 2 षटकार तर मनीष पांडेने 4 चौकार, एका षटकाराची आतषबाजी केली.
रबाडाच्या पहिल्या 2 षटकात हैदराबाद संघाने 37 धावांची आतषबाजी केली. यातील त्याचे दुसरे षटक अधिक महागडे ठरले. या षटकात डावखुऱया वॉर्नरने 4 चौकार व 1 षटकार फटकावत 22 धावा वसूल केल्या. त्यानंतर या जोडीने 9 व्या षटकातच शतकही फलकावर लावले. हैदराबादच्या डोकेदुखी ठरणाऱया या ‘लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन’मुळे दिल्लीच्या गोलंदाजांवर बऱयाच मर्यादा येत राहिल्या आणि साहा व वॉर्नर यांनी नेमका याचाच सर्वाधिक फायदा घेतला. ज्या चेंडूंवर फटकेबाजी करता येणार नाही, त्यावर एकेरी-दुहेरी धावा घेत स्ट्राईक रोटेट करण्यावरही या जोडीने उत्तम भर दिला. रबाडाला या सामन्यात 4 षटकात 54 धावा मोजाव्या लागल्या.
वॉर्नर उत्तम चेंडूंवर देखील तुटून पडत असताना साहा सुद्धा फारसा मागे नव्हता. त्याने जेथे-जेथे संधी मिळेल, त्या ठिकाणी उत्तूंग फटके लगावणे अधिक पसंत केले. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या पहिल्या दोन षटकात हैदराबादच्या या सलामीवीरांनी 24 धावांची आतषबाजी केली. पण, त्याच्या तिसऱया षटकात वॉर्नर बाद झाला आणि धोकादायक ठरलेली ही जोडी फुटली.
कौशल्याने गोलंदाजी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱया अश्विनने चेंडूचा वेग आणखी कमी करत वॉर्नरला मोठा फटका लगावण्याच्या मोहात पाडले आणि वॉर्नर या जाळय़ात अलगद अडकला. एक्स्ट्रा कव्हरवरील पटेलने वॉर्नरचा सोपा झेल टाळला. प्ले-ऑफमधील स्थान निश्चितीच्या आशाअपेक्षा कायम ठेवण्यासाठी हा सामना कोण्त्याही परिस्थितीत जिंकणे हैदराबादला क्रमप्राप्त होते. ते नजरेसमोर ठेवत वॉर्नर व साहा यांनी प्रारंभापासूनच आक्रमणावर भर दिला होता.
वॉर्नर बाद झाल्यानंतर साहाने तुषार देशपांडेला चौकार फटकावत आपले अर्धशतक साजरे केले. या हंगामातील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. त्याने तिसऱया स्थानावरील मनीष पांडेसमवेत पुढील 21 चेंडूत आणखी एक अर्धशतकी भागीदारी देखील साकारली. मनीष पांडेला प्रारंभी अपेक्षित सूर मिळत नव्हता. साहाने मात्र एका बाजूने फटकेबाजीचा धडाका कायम राखला होता. अखेर जलद गोलंदाज नोर्त्जेने साहाला 87 धावांवर कर्णधार श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. डावातील 15 व्या षटकात नोर्त्जेच्या तिसऱया चेंडूवर उत्तूंग फटका लगावण्याचा साहाचा प्रयत्न फसला आणि मिडऑफवर त्याचा सहज झेल टिपला गेला.
येथे साहाचे शतक अवघ्या 13 धावांनी हुकले असले तरी त्यापूर्वी त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली असल्याचे धावफलकावरुन अधोरेखित झाले. तो बाद झाला, त्यावेळी हैदराबादने 14.3 षटकात 2 बाद 170 धावांपर्यंत मजल मारली होती.
साहा व पांडे यांनी दुसऱया गडय़ासाठी आणखी 63 धावांची भर घातली. साहा बाद झाल्यानंतर मनीष पांडेने खेळाची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवत आक्रमक फलंदाजीची मालिका कायम राखली आणि यामुळे सनरायजर्सने 2 बाद 219 धावांचा टप्पा सहज गाठला. मनीष पांडे 44 तर केन विल्यम्सन 10 चेंडूत 11 धावांवर नाबाद राहिले.
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर झे. पटेल, गो. अश्विन 66 (34 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), वृद्धिमान साहा झे. अय्यर, गो. नोर्त्जे 87 (45 चेंडूत 12 चौकार, 2 षटकार), मनीष पांडे नाबाद 44 (31 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), केन विल्यम्सन नाबाद 11 (10 चेंडूत 1 चौकार). अवांतर 11. एकूण 20 षटकात 2 बाद 219.
गडी बाद होण्याचा क्रम
1-107 (वॉर्नर, 9.4), 2-170 (साहा, 14.3)
गोलंदाजी
नोर्त्जे 4-0-37-1, रबाडा 4-0-54-0, रविचंद्रन अश्विन 3-0-35-1, अक्षर पटेल 4-0-36-0, तुषार देशपांडे 3-0-35-0, स्टोईनिस 2-0-15-0
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : अजिंक्य रहाणे पायचीत गो. रशीद 26 (19 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), धवन झे. वॉर्नर, गो. शर्मा 0 (1 चेंडू), स्टोईनिस झे. वॉर्नर, गो. नदीम 5 (6 चेंडूत 1 चौकार), हेतमेयर त्रि. गो. रशीद 16 (13 चेंडूत 3 चौकार), ऋषभ पंत झे. बदली खेळाडू (गोस्वामी), गो. संदीप शर्मा 36 (35 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), श्रेयस अय्यर झे. विल्यम्सन, गो. शंकर 7 (12 चेंडू), अक्षर पटेल झे. बदली खेळाडू (गर्ग), गो. रशीद 1 (4 चेंडू), रबाडा त्रि. गो. नटराजन 3 (7 चेंडू), रविचंद्रन अश्विन झे. समद, गो. होल्डर 7 (5 चेंडूत 1 चौकार), तुषार देशपांडे नाबाद 20 (9 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), नोर्त्जे झे. बदली खेळाडू (गर्ग), गो. नटराजन 1 (3 चेंडू). अवांतर 9. एकूण 19 षटकात सर्वबाद 131.
गडी बाद होण्याचा क्रम
1-1 (धवन, 0.3), 2-14 (स्टोईनिस, 1.6), 3-54 (हेतमेयर, 6.1), 4-55 (रहाणे, 6.5), 5-78 (अय्यर, 11.3), 6-83 (अक्षर, 12.5), 7-103 (रबाडा, 15.6), 8-103 (पंत, 16.1), 9-125 (अश्विन, 17.6), 10-131 (नोर्त्जे, 18.6).
गोलंदाजी
संदीप शर्मा 4-0-27-2, नदीम 1-0-8-1, होल्डर 4-0-46-1, रशीद 4-0-7-3, टी. नटराजन 4-0-26-2, विजय शंकर 1.5-0-11-1, डेव्हिड वॉर्नर 0.1-0-2-0