ऑनलाईन टीम / हैदराबाद :
हैदराबादमध्ये एका भंगारच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एकजण आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाला. हैदराबादमधील भोईगुडा परिसरात पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील भोईगुडा परिसरात असलेल्या एका भंगारच्या गोदामाला आज पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात लाकडाचा मोठा साठा असल्यामुळे क्षणार्धात आगीने उग्र रुप धारण केले. यावेळी 12 कामगार गोदामातील पहिल्या मजल्यावर झोपले होते. गोदामाला तळमजल्यावर आग लागल्याने शटर उघडून कामगारांना बाहेर पडता आले नाही.
दुदैवाने या आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला. तर एक स्वत:चा जीव वाचविण्यात यशस्वी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंर आगीवर नियंत्रण मिळवता आले. 11 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.