महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी प्रचार : अमित शाह, योगी आदित्यनाथ, जे.पी.नड्डा यांच्या सभा
वृत्तसंस्था / हैद्राबाद
हैदराबाद महापालिका निवडणूक यंदा राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू ठरताना दिसून येत आहे. भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाग घेत आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व प्रचार करण्यासाठी हैदराबादमध्ये पोहोचणार आहे. दक्षिणेकडील राज्यामधील या महापालिका निवडणुकीकरता भाजपने लावलेला जोर निश्चितच चकित करणारा आहे. तेलंगणासह दक्षिण भारतात स्वतःचा प्रभाव वाढविण्यासाठी भाजपने आता युद्धपातळीवर प्रयत्न चालविले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही हैदराबाद महापालिका निवडणुकीकरता प्रचार करणार आहेत. योगी आदित्यनाथ 27 नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये प्रचारसभेसह रोड शो करणार आहेत. मल्कज्गिरी आणि हैदराबादमध्ये ते प्रचार करणार आहेत. 28 नोव्हेंबर रोजी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा मल्कज्गिरी क्षेत्रात प्रचार करतील.
या दोन दिग्गजानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवारांकरता मते मागणार आहेत. 29 नोव्हेंबर रोजी शाह सिकंदराबाद भागात रोड शो करणार आहेत. साध्वी निरंजन ज्योति या देखील भाजप उमेदवाराच्या प्रचाराकरता हैदराबादमध्ये पोहोचणार आहेत.
1 डिसेंबर रोजी हैदराबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ हे एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमध्ये प्रचार करणार असल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे. भाजप आणि एआयएमआयएम यांच्यातील वाप्युद्ध आता चांगलेच रंगणार आहे.
भाजपचा आक्रमक प्रचार
राष्ट्रीय राजकारणात मोठे स्थान मिळवून एका मागोमाग एका राज्यात स्वतःचा प्रभाव वाढवू पाहणारा भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही गांभीर्याने घेत पूर्ण जोर लावत असल्याने अन्य राजकीय पक्षांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता प्राप्त करून अन्य राजकीय पक्षांचे बळ कमी करण्यावर भाजपचा भर आहे. भाजपला यात काही प्रमाणात यश मिळाले तरीही ते महत्त्वाचे ठरणार आहे. तेलंगणात भाजपचा फारसा प्रभाव नसतानाही 4 खासदार निवडून आले आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप मुख्य विरोधी पक्ष ठरू शकतो.