ऑनलाईन टीम / हैदराबाद :
हैदराबादमध्ये DRDO संशोधन संस्थेने दोन कंटेनरमध्ये मोबाईल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी (एमव्हीआरडीएल) नावाची मोबाईल प्रयोगशाळा सुरू केली आहे. कोरोना व्हायरस स्क्रीनिंग आणि त्यासंदर्भात संशोधन, विकास हा या मोबाईल प्रयोगशाळेचा उद्देश आहे.
हैदराबादच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये या लॅब तयार करण्यात आल्या असून, या लॅबमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळेच्या सर्व सुविधा असल्याचा दावा डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक चाचणी या लॅबमध्ये करता येते. ही लॅब 100 टक्के सुरक्षित असून, गरजेनुसार ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली जाऊ शकते.
अशा प्रकारची लॅब तयार करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, डीआरडीओने केवळ 15 दिवसात ही लॅब विकसित केली आहे. या लॅबमध्ये दिवसाला 1000 टेस्ट केल्याचा दावा डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.