सरस गोलंदाजीमुळे दिल्लीला विजयाची अपेक्षा
चेन्नई / वृत्तसंस्था
रिषभ पंतची ताकद विरुद्ध रशीद खानच्या भात्यातील असंख्य ट्रिक्स, अशी रंगतदार लढत आज दिल्ली कॅपिटल्स-सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल साखळी सामन्यात अपेक्षित आहे. सरस गोलंदाजीमुळे दिल्लीचा संघ विजयाचा दावेदार भासत असला तरी प्रत्यक्षात ते या संधीचे विजयात रुपांतर करु शकणार का, हे लढतीत स्पष्ट होईल. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे.
यंदा आयपीएल मोसमात टीकेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या चेपॉकच्या ट्रकवर या मोसमातील ही 10 वी व शेवटची लढत असेल. रिषभ पंत व डेव्हिड वॉर्नर हे दोन्ही कर्णधार यात विजय संपादन करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या 10 सामन्यात पहिल्या डावात मोजक्याच संघांना 170 व त्याहून अधिक धावा फटकावणे शक्य झाले आहे. संथगती गोलंदाजीचा उत्तम समाचार घेऊ शकणारे फलंदाज या खेळपट्टीवर अधिक यशस्वी होण्याची शक्यता विचारात घेता रिषभ पंतसारखे फलंदाज उपयुक्त योगदान देऊ शकतात.
डावखुरा शिखर धवन उत्तम बहरात आहे. पण, पृथ्वी शॉ पहिल्या लढतीनंतर फारसा प्रभावी खेळ साकारु शकलेला नाही. ही दिल्लीची चिंता असेल. हैदराबादने या हंगामातील आपले पहिले चारही सामने चेन्नईतच खेळले आहेत. त्यामुळे, त्यांना या खेळपट्टीची उत्तम कल्पना आहे.
केन विल्यम्सन संघात दाखल
दिग्गज फलंदाज केन विल्यम्सन संघात परतला असल्याने सनरायजर्स हैदराबादची फलंदाजी आता मजबूत असणार आहे. टी. नटराजन या हंगामात खेळणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट झाले असल्याने व मनीष पांडेचा स्ट्राईक रेट 112 च्या आसपास असल्याने वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, विल्यम्सन व रशीद या विदेशी खेळाडूंवरच त्यांना अधिक अवलंबून रहावे लागेल, हे स्पष्ट आहे.
सनरायजर्स हैदराबादची गोलंदाजी कमकुवत राहिली असून संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल किंवा अष्टपैलू विजय शंकर यांच्यापैकी कोणीही आत्मविश्वासाने प्रदर्शन साकारु शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. साहजिकच, अनुभवी रशीद व भुवनेश्वर कुमारची 8 षटके वगळता दिल्लीला अन्य 12 षटकात झगडावे लागले तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही.
अश्विनमुळे दिल्लीला दिलासा
रविचंद्रन अश्विन बहरात परतत असल्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी ही दिलासा देणारी बाब असेल. चेपॉकची खेळपट्टी अश्विनच्या गोलंदाजी शैलीला अनुकूल आहे. जलद गोलंदाज कॅगिसो रबाडा मात्र अद्याप निष्प्रभ ठरत आला असून ख्रिस वोक्स हा सरस पर्याय ठरु शकेल का, याचा निर्णय पंतला घ्यावा लागेल. ललित यादव, अवेश खान अगदी अंतिम क्षणी काही कारणामुळे खेळू शकले नाहीत तरच अजिंक्य रहाणे, इशांत शर्मासारख्या अव्वल खेळाडूंना संधी मिळेल. अन्यथा, पुन्हा एकदा ते राखीव खेळाडूतच बसून राहतील, असे संकेत आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स ः ऋषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेतमेयर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, ऍनरिच नोर्त्झे, इशांत शर्मा, अवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करण, सॅम बिलिंग्ज.
सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यम्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विराट सिंग, जेसॉन होल्डर, मोहम्मद नबी, रशीद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी, जगदीश सुचिथ, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान.
सामन्याची वेळ- सायं. 7.30 वा.