वृत्तसंस्था/ मुंबई
2022 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी येथे सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी हैदराबाद संघाला या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असून त्यांचा हा औपचारिक सामना आहे.
या स्पर्धेच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी हैदराबाद संघाला कोणत्याही परिस्थितीत मंगळवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवावा लागेल. या स्पर्धेत हैदराबाद संघाने सुरूवातीला सलग पाच सामने जिंकून आपली घोडदौड राखली होती पण त्यानंतर या संघाने आपले पाच सामने गमविले आहेत. आता प्राथमिक फेरीतील हैदराबादचे दोन सामने बाकी आहेत. उर्वरित दोन सामने जिंकले तर हैदराबाद संघाचे 14 गुण होतील आणि त्यांना या स्पर्धेतील इतर संघांच्या सामन्यांच्या निकालांची वाट पहावी लागेल. मंगळवारचा सामना येथील वानखेडे स्टेडियमवर होणार असून हैदराबादने या सामन्यात विजयाची संधी गमविली तर त्यांना प्ले ऑफ फेरीपासून वंचित व्हावे लागेल. हैदराबाद संघाला मंगळवारच्या सामन्यात फलंदाजी सुधारावी लागेल. कर्णधार विल्यम्सनने या स्पर्धेत 12 सामन्यांतून 208 धावा जमविल्या आहेत. पण सध्या विल्यम्सन फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. राहुल त्रिपाठी, मॅरक्रम आणि निकोलस पूरन यांच्याकडून अधिक धावा होणे जरूरीचे आहे. गेल्या दोन सामन्यात हैदराबादची मधलीफळी कोलमडल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला होता. वॉशिंग्टन सुंदर आणि शशांक सिंग हे उपयुक्त फलंदाज आहेत. हैदराबाद संघाच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने उमरान मलिक, भुवनेश्व़रकुमार, श्रेयस गोपाल, जान्सन यांच्यावर राहील. उमरान मलिकने या स्पर्धेत आतापर्यंत 18 गडी बाद केले आहेत.
मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी तसेच गोलंदाजी दर्जेदार होत नसल्याने त्यांना या स्पर्धेत शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन यांच्यावर फलंदाजीची भिस्त राहील. या सामन्यात सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा उपलब्ध राहणार नाहीत. डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग हे फलंदाजीत आतापर्यंत फारसे यशस्वी ठरले नाहीत. बुमराह, मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय सिंग यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील.
संभाव्य संघ
मुंबई इंडियन्स– रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रित सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, थंपी, शोकीन, बुमराह, उनादकट, आर्चर, मार्कंडेय, एम. अश्विन, मेरेडिथ, मिल्स, अर्शद खान, सॅम्स, ब्ा्रssव्हिस, पोलार्ड, संजय यादव, जुयल आणि इशान किशन.
सनरायजर्स हैदराबाद– विल्यम्सन(कणर्धार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, मॅरक्रम, पूरन, अब्दुल समद, गर्ग, विष्णु विनोद, फिलीप्स, समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शेफर्ड, जान्सन, सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वरकुमार, ऍबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फारूकी, उमरान मलिक आणि टी. नटराजन.