वृत्तसंस्था/ हैदराबाद
वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करीत श्रीयांशी परदेशीवर मिळविलेल्या विजयाने हैदराबाद हंटर्सने पाचव्या प्रिमियर लीग बॅडमिंटन लीगमधील लढतीत मुंबई रॉकेट्सवर 4-3 असा रोमांचक विजय मिळविला.
गुणतक्त्यात तळाच्या स्थानाशी असलेल्या हैदराबाद हंटर्सला थोडा दिलासा मिळाला आहे. 0-3 अशा पिछाडीवर पडल्यानंतर सिंधूने शानदार खेळ करीत सहाव्या स्थानावर असणाऱया मुंबई रॉकेट्सला पराभवाचा धक्का दिला. सिंधूला याआधीच्या लढतीत मिशेली लि व ताय झू यिंगकडून पराभूत व्हावे लागले होते. पण यावेळी हंटर्सच्या ट्रम्प सामन्यात तिने श्रीयांशीचा 15-5, 15-10 असा पराभव केला. नंतर प्रियांशू राजावतने पुरुष एकेरीत कोरियन खेळाडू ली डाँग केयुनचा आणि व्लादिमिर इव्हानोव्ह-एन.सिक्की रेड्डी यांनी केएस रँग व पिया बर्नाड्थ यांचा पराभव करून मुंबईवर विजय मिळविला. मुंबईला पी. कश्यपने चार पराभवानंतर पहिला विजय मिळवित आघाडी मिळवून दिली होती.