वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत हॉकी या क्रीडाप्रकारात भारतीय पुरूष आणि महिला संघांनी दर्जेदार कामगिरी केल्याने त्यांच्या हॉकीतील मानांकनात भारतीय संघांनी बऱयापैकी झेप घेतली आहे. हॉकीच्या विश्व ताज्या मानांकनात पुरूष विभागात भारताने तिसरे तर महिला विभागात आठवे स्थान पटकाविले आहे.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाने तब्बल 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच कास्यपदक पटकाविले. आता हॉकीच्या विश्व़ मानांकनात ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता बेल्जियम पहिल्या, रौप्यपदक विजेता ऑस्ट्रेलिया दुसऱया तर कास्यपदक विजेता भारत तिसऱया स्थानावर आहे. यापूर्वी भारतीय पुरूष हॉकी संघ या मानांकनात चौथ्या स्थानावर होता.
भारतीय महिला हॉकी संघाने हॉकीच्या ताज्या मानांकन यादीत आठवे स्थान मिळविले आहे. यापूर्वी या यादीत भारतीय महिला संघ नवव्या स्थानावर होता. टोकियो आाŸलिपिंक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र कास्यपदकाच्या लढतीत भारताला ब्रिटनकडून 3-4 अशा गोलफरकाने निसटता पराभव स्वीकारावा लागला.