सरावावेळी निर्बंध काटेकोर पाळण्याचे आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोव्हिड 19 विषाणूविरुद्धची लढाई दीर्घ काळ चालणार असल्याने लॉकडाऊनमध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. यामुळे क्रीडापटूंही आता ट्रेनिंगसाठी सज्ज होत आहेत. जर्मनीत बुंदेस्लिगाच्या रूपात स्पर्धात्मक खेळालाही सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशननेही (एफआयएच) हॉकीचा सराव सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले असून त्यांनी हॉकीपटूंसाठी नियमावली तयार केली आहे.
एफआयएचने नियमावली जाहीर केली आणि भारत सरकारनेही लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रेक्षकाशिवाय क्रीडा संकुल व स्टेडियम्स खुले करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले किंवा पात्र होऊ इच्छिणारे क्रीडापटू सरावासाठी मैदानात सर्वप्रथम उतरताना दिसतील. भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच ऑलिम्पिक तिकीट निश्चित केले असून लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून ते बेंगळूरच्या साई केंद्रातच राहिले आहेत. ट्रेनिंगच्या सर्व सुविधा असलेल्या ठिकाणीच ते असून सराव सुरू करण्यासाठी साईच्या परवनगीची ते वाट पाहत आहेत. साईनेही सरावासाठी नियमावली तयार केली आहे. एफआयएचनेही सरावासाठी दिशानिर्देश जाहीर केले असून आता सरावाचा मार्ग मोकळा झाला आहे. एफआयएचने एकूण 12 मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. जगभरातील सर्व हॉकीपटूंना त्यानुसार सरावाला सुरुवात करावी लागणार आहे.
सरकारचे नियम व दिशानिर्देश काटेकोरपणे पाळणे, कोव्हिडची लक्षणे आढळल्यास सरावापासून दूर राहणे, स्वतःच्या वाहनाने सरावाच्या ठिकाणी थोडा वेळ आधी येणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, चेंडूला हाताने स्पर्श न करणे, सहकाऱयांसमवेत जल्लोष न करणे, सरावाआधी व नंतर हात निर्जंतुक करणे, थुंकणे व मास्कला हाताने स्पर्श करायचे टाळणे, स्वतंत्र पाण्याची बाटली वापरणे, स्वतःचेच पूर्ण किट वापरणे, सरावानंतर थेट निवासस्थानी किंवा हॉस्टेलवर जाणे, अशी नियमावली तयार करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने क्रीडापटूंच्या विदेशात ट्रेनिंग घेण्याला बंदी घातली असल्याने त्यांना या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. विदेशात होणाऱया स्पर्धांत सहभागी होण्याबाबत सरकारच्या आदेशांनुसार निर्णय घेतले जातील. एफआयएचने याआधीच प्रो हॉकी लीग जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे.