कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरीतील आघाडीची हॉकीपटू ऐश्वर्या राजेश चव्हाण हिची भारतीय हॉकी संघात निवड झाली. एफआयएच हॉकी प्रो-लीग 2021-22 अंतर्गत हॉलंडच्या संघाविरुद्ध भुवनेश्वर येथील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात ती भारतीय संघातून खेळली. तिने भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिल्याने भारतीय संघाने हॉलंडवर पहिल्या गोलची नोंद केली. रविवारी सायंकाळी कोल्हापुरात ऐश्वर्याचे आगमन झाल्यावर तिने महाराणी ताराराणीच्या पुतळय़ाला अभिवादन केले. कोल्हापुरच्या वतीने कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यासह हॉकी कोल्हापूर व हॉकी प्रेमींनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून ऐश्वर्याचे स्वागत केले.
कोल्हापुरला फुटबॉल, क्रिकेट आणि हॉकीची क्रेज आहे. हॉकी खेळाडूंनी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर खेळून मैदाने गाजवली आहेत. आता ऐश्वर्याने भारतीय संघात स्थान मिळवून, आंतरराष्ट्रीय मैदान गाजवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. हॉलंडच्या विरूध्द खेळून, भारतीय संघाला विजय मिळून देण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. ऐवढेच काय पण हॉकी क्रिडा प्रकारात स्वतःबरोबर भारतासह कोल्हापुरचे नाव जागतिक पातळीवर सुवर्णाक्षराने कोरले आहे. कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमध्ये अत्याधुनिक ऍस्ट्रोटर्फ बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच ऐश्वर्याने भारतीय संघापर्यंत मारलेली मजल कोल्हापुरच्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील आणि हॉकी असोसिएशन डिस्ट्रिकचे अध्यक्ष विजय साळोखे (सरदार) यांनी ऐश्वर्याचे जंगी स्वागत केले. ऐश्वर्याच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ताराराणी पुतळा येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली लाईन बजार, बावडा, महावीर कॉलेजमार्गे दसरा चौकात आली. येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळय़ाला अभिवादन करून ही रॅली छत्रपती शिवाजी चौकाकडे मार्गस्थ झाली. रॅली चौकात आल्यानंतर शिवरायांच्या पुतळय़ाला ऐश्वर्याने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दुचाकी रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत जवळपास 200 खेळाडू, कुटुंबिय, नातेवाईक सहभागी झाले होते. यावेळी मोहन भांडवले, सागर जाधव, संताजी भोसले, धीरज जाधव, राहुल गावडे, अनिल परांडेकर, योगेश देशपांडे, वडील राजेश चव्हाण, आई अनुराधा चव्हाण, आजी शारदा चव्हाण, भाऊ रणजीत चव्हाण, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
भारतीय संघात खेळल्याचा आनंद वेगळाच
कोल्हापुरात हॉकीचे धडे घेतले, येथेच हॉकी खेळाविषयी आवड निर्माण झाली. भारतीय संघात निवड झाल्यानंतर तेथील प्रशिक्षकांनी घालून दिलेल्या नियम आणि अटी फार कठीण होत्या. तरीही मी त्यांच्या नियमात राहून खेळले. भारताने हॉलंडला पहिल्यांदाच हॉकीमध्ये हरवले आहे. मी भविष्यातही चांगले खेळून माझ्य़ाबरोबर देशाबरोबर कोल्हापुरचे नाव मोठे करेन.
हॉकीपटू ऐश्वर्या चव्हाण