वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हॉकी संघातील गोलरक्षक पी.आर. श्रीजेशला 2021 या वर्षातील सर्वोत्तम वर्ल्ड गेम्स ऍथलीटचा पुरस्कार देण्यात आला आहे. असा पुरस्कार मिळविणारा श्रीजेश हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. 2020 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने पहिल्यांदा हा पुरस्कार मिळविला होता.
2021 च्या कालावधीत विश्व स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कार शर्यतीमध्ये भारताचा हॉकी गोलरक्षक श्रीजेश, स्पेनचा क्लायम्बर अल्बर्टो लोपेझ आणि इटलीची वुशू खेळाडू मिचेली गिओरडॅनो यांच्यात चुरस झाली. पण श्रीजेशने आपल्या दोन्ही प्रतिस्पर्धांना मागे टाकत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकाविला. श्रीजेशने यापूर्वी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केले असून टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघामध्ये त्याचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने 33 वर्षीय श्रीजेशच्या निवडीला मान्यता दिली होती. श्रीजेशला या सर्वोत्तम पुरस्काराच्या मतदानात 1,27,647 मते तर लोपेझला 67,428 तर गिओरडॅनोला 52046 मते मिळाली.
गेल्या ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनतर्फे श्रीजेशची 2021 मधील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. 2006 साली श्रीजेशने भारताच्या वरिष्ठ पुरूष हॉकी संघात आपले पदार्पण केले होते. 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये तसेच 2014 च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आणि आशियाई स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 2016 रिओ ऑलिंपिक स्पर्धेत श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. श्रीजेशने 244 सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले असून या पुरस्काराबद्दल आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने श्रीजेशचे अभिनंदन केले आहे.