वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी खेळाडू व हॉकी प्रशिक्षक एमके कौशिक यांना कोरोनाची लागण झाली असून त्यावर उपचार करण्यासाठी हॉकी इंडियाने 5 लाख रुपयांची मदत दिली आहे. 66 वर्षीय कौशिक येथील एका नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहेत.
1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. त्या संघाचे कौशिक हे सदस्य होते. गेल्या महिन्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. ‘हॉकी ऑलिम्पियन कौशिक यांच्यावर जेथे उपचार सुरू आहेत, त्या हॉस्पिटलकडे हॉकी इंडिया 5 लाख रुपये हस्तांतरित करणार आहे. सोमवारी 10 मे रोजी दिल्लीतील लॉकडाऊन खुलणार असून कौशिक यांचे पुत्र एहसान कौशिक यांना याची माहिती देण्यात आली आहे,’ असे हॉकी इंडियाने निवदेनाद्वारे सांगितले.
कौशिक यांना लक्षणे दिसत होती, तरीही 17 एप्रिल रोजी त्यांच्या आरटीपीसीआर व आरएटी चाचणीत ते निगेटिव्ह असल्याचे दिसून आले होते. मात्र आठवडय़ानंतर त्यांच्या छातीचे सीटी स्कॅन करण्यात आले आणि कोव्हिडमुळे न्युमोनिया झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले. ‘तेव्हापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची स्थिती गंभीरही नाही आणि स्थिरही नाही, अशी आहे. रात्रीच्या वेळी त्यांच्या ऑक्सिजनचा स्तर बराच खालावत असल्याने हीच मोठी समस्या बनली आहे,’ असे एहसान यांनी सांगितले.
कौशिक यांनी वरिष्ठ पुरुष व महिला संघांचे प्रशिक्षकपद भूषविले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या पुरुष संघाने 1998 मधील बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. याशिवाय 2006 मधील दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला संघाने कांस्यपदक मिळविले होते. 1998 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्यानंतर 2002 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला होता. भारतात सध्या कोरोनाचा मोठा कहर सुरू असून रोज सुमारे तीन हजारहून अधिक बळी जात आहेत.