नवी दिल्ली
हॉकी इंडिया आपल्या पॅनेलमध्ये 126 नवे पंच आणि तांत्रिक अधिकाऱयांचा समावेश केला आहे. देशातील होणाऱया उपकनिष्ठ आणि कनिष्ठ गटातील हॉकी स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हॉकी इंडियाने ही तरतूद केली आहे.
हॉकी इंडियाच्या या नव्या पॅनेलमध्ये पंच, तांत्रिक अधिकारी तसेच जजेस यांचा समावेश करण्यात आला आहे. हॉकी इंडियाच्या या नव्या पॅनेलसाठी ऑनलाईनद्वारे कार्यशाळा 2020 च्या सप्टेंबरपासून ते चालू वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी दोन गट करण्यात आले होते. हॉकी इंडियाच्या नव्या पॅनेलमध्ये एकूण 60 पंचांचा समावेश असून त्यामध्ये 21 महिला आणि 39 पुरूष पंचांचा समावेश आहे. हॉकी इंडियाच्या पॅनेलमध्ये यापूर्वी 50 पुरूष आणि 16 महिला असे एकूण 66 पंचांचा समावेश होता. आता देशात होणाऱया कनिष्ठ आणि उपकनिष्ठांच्या हॉकी स्पर्धांसाठी हॉकी इंडियातर्फे या पॅनेलमधील निवडक पंचांची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या आशियाई हॉकी फेडरेशनतर्फे ऑनलाईनद्वारे सुरू असलेल्या शैक्षणिक कार्यशाळेत उपस्थित राहण्याची संधी या नव्या पॅनेलमधील पंचांना मिळाली आहे.