वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील नवोदित होतकरू हॉकी प्रशिक्षकांसाठी हॉकी प्रशिक्षणाचे प्राथमिक धडे शैक्षणिक अभ्यास कालावधीमध्ये ऑनलाईनद्वारे दिले जाणार असल्याची घोषणा हॉकी इंडियाने शुक्रवारी केली आहे. हॉकी इंडियातर्फे पहिल्यांदाच हॉकी प्रशिक्षकांसाठी ही योजना राबविली जात आहे.
ऑनलाईनद्वारे देण्यात येणाऱया हॉकी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी हॉकी इंडियातर्फे इच्छुकांकडून प्रशिक्षकासाठी अर्ज मागविण्यात आले असून ऑनलाईनद्वारे दिल्या जाणाऱया हॉकी प्रशिक्षणासाठी केवळ 60 व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. हॉकी प्रशिक्षकासाठी इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षणाचा अनुभव जरुरीचा आहे. जिल्हास्तरीय, शालेय किंवा विद्यापीठ हॉकी संघाला किमान तीन वर्षांचा प्रशिक्षण देण्याचा अनुभव इच्छुक उमेदवाराला असणे आवश्यक आहे. गेल्या वषीच्या मार्चमध्ये हॉकी इंडियातर्फे ‘कोचिंग एज्युकेशन पाथ वे’ या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. पण त्यानंतर कोरोना समस्येमुळे ही योजना थांबविण्यात आली होती. हॉकी इंडियाच्या 2019 सालातील या नव्या योजनेचा लाभ देशातील सुमारे 700 हॉकी प्रशिक्षकांना मिळाला आहे.