लॉसेन : गुरूवारी घोषित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ताज्या मानांकन यादीत 2021 सालाअखेर भारताच्या पुरूष हॉकी संघाने तिसरे स्थान तर भारताच्या महिला हॉकी संघाने नववे स्थान पटकाविले आहे.
मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळवून तब्बल 41 वर्षांच्या कालावधीनंतर आपल्या संघाला ऑलिंपिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले. तसेच ढाका येथे नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने तिसरे स्थान व कास्यपदक मिळविले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ताज्या मानांकन यादीत ऑलिंपिक चॅम्पियन्स बेल्जियम 2632.12 मानांकन गुणांसह दुसऱया तर ऑस्ट्रेलिया 2642.25 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत 2296.038 गुणांसह तिसऱया, हॉलंड 2234.33 गुणांसह चौथ्या, जर्मनी 2038.71 गुणांसह पाचव्या, इंग्लंड 1990.62 गुणांसह सहाव्या, अर्जेंटिना 1826.11 गुणांसह सातव्या, न्यूझीलंड 1598.24 गुणांसह आठव्या, स्पेन 1532.33 गुणांसह नवव्या आणि मलेशिया 1427.18 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.