वृत्तसंस्था/ लॉसेन
2020 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) घोषित केलेल्या ताज्या मानांकन यादीत पुरूष विभागात भारताने चौथे स्थान तर महिलांच्या विभागात नववे स्थान मिळविले. कोरोना महामारीमुळे 2020 च्या हॉकी हंगामाला फार मोठा धक्का बसला.
सोमवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने पुरूष आणि महिलांच्या ताजी मानांकन यादी जाहीर केली. पुरूष विभागात बेल्जियमने तर महिला विभागात हॉलंडने प्रथम स्थान मिळविले. येत्या जानेवारीत आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनतर्फे विश्व मानांकनासाठी नव्या पद्धतीची अंमलबजावणी केली जाणार आहे. कोरोना महामारी समस्येमुळे 2020 च्या कालावधीत सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात काही हॉकी स्पर्धा घेणे शक्य झाले. या स्पर्धामुळे बेल्जियम, जर्मनी, हॉलंड आणि ब्रिटन देशांच्या पुरूष आणि महिला हॉकी संघांच्या गुणांमध्ये फेरबदल झाला.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरूषांच्या मानांकन यादीत विद्यमान विश्वविजेता आणि युरोपियन चॅम्पियन्स बेल्जियम 2496.88 गुणांसह पहिल्या, ऑस्ट्रेलिया 2385.70 गुणांसह दुसऱया, हॉलंड 2257.96 गुणांसह तिसऱया, भारत 2063.78 गुणांसह चौथ्या, ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना 1967.39 गुणांसह पाचव्या, जर्मनी 1944.34 गुणांसह सहाव्या, ब्रिटन 1743.77 गुणांसह सातव्या, न्यूझीलंड 1575.00 गुणांसह आठव्या, स्पेन 1559.32 गुणांसह नवव्या आणि 1417.37 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिला मानांकन यादीत हॉलंड 2631.99 गुणांसह पहिल्या, अर्जेंटिना 2174.61 गुणांसह दुसऱया, जर्मनी 2054.28 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रेलिया 2012.89 गुणांसह चौथ्या, इंग्लंड 1952.74 गुणांसह पाचव्या, न्यूझीलंड 1818.98 गुणांसह सहाव्या, स्पेन 1802.13 गुणांसह सातव्या, आयर्लंड 1583.09 गुणांसह आठव्या, भारत 1543.00 गुणांसह नवव्या आणि चीन 1521.00 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.