प्रो हॉकी लीगसह एकूण सहा सामने खेळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा पुरुष हॉकी संघ बुधवारी ब्युनॉस एअर्सकडे रवाना झाला. तेथे हा संघ यजमान अर्जेन्टिनाविरुद्ध एफआयएच प्रो हॉकी लीगमधील दोन सामने 11 व 12 एप्रिल रोजी खेळणार आहे.
हॉकी इंडियाने ट्विटच्या माध्यमातून खेळाडू व साहायक स्टाफची छायाचित्रे पोस्ट केली असून ‘नेक्स्ट स्टॉप अर्जेन्टिना!’ असे म्हणत भारतीय संघासाठी शुभेच्छा पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या दौऱयात भारतीय संघ यजमान संघाविरुद्ध 6 व 7 एप्रिल रोजी दोन सराव सामनेही खेळणार आहे. प्रो हॉकी लीगमधील सामने झाल्यानंतर 13 व 14 एप्रिल रोजी ऑलिम्पिकच्या तयारीचा भाग म्हणून आणखी दोन सराव सामने खेळणार आहे.
मनप्रीत सिंग अलीकडेच झालेल्या युरोप दौऱयात वैयक्तिक कारणामुळे सहभागी झाला नव्हता. तो तसेच अनुभवी ड्रग फ्लिकर रुपिंदर पाल सिंग व वरुण कुमार यांचेही या संघात पुनरागमन झाले आहे. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील 22 सदस्यीय संघाने बुधवारी अर्जेन्टिनाकडे प्रयाण केले. या संघात उपकर्णधार हरमनप्रीत सिंग, गोलरक्षक पीआर श्रीजेश, कृशन बहादूर पाठक तसेच अमित रोहिदास, गुरिंदर सिंग, विवेक सागर प्रसाद, राज कुमार पाल, निलकांता शर्मा, शमशेर सिंग, गुर्जंत सिंग, दिलप्रीत सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय यांचा समावेश आहे. मागील दौऱयातीलच हे खेळाडू कायम ठेवण्यात आले आहेत. याशिवाय या संघात जसकरण सिंग, सुमित, शैलानंद लाक्रा यांनाही निवडण्यात आले आहे. सुमारे वर्षभरानंतर ते पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत.