उपचाराशिवायच संसर्गावर मात : आयसीएमआरच्या सर्वेक्षणात खुलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा कोरोना विषाणू संसर्गानंतर उपचाराशिवायच अनभिज्ञ स्थितीत बरा झाला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका नव्या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. लोकसंख्येपर्यंत कोरोनाचा फैलाव आणि प्रभावाचा शोध घेण्यासाठी सीरोलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार हॉटस्पॉट शहरांच्या एक तृतीयांश लोकसंख्येत संसर्ग फैलावला होता. हे रुग्ण कुठल्याही उपचारांशिवाय तसेच त्यांच्याही नकळतच बरे झाले आहेत. या सर्वांच्या शरीरातून अँटीबॉडी प्राप्त झाली आहे. आयसीएमआरच्या या सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्यात आला आहे.
आयसीएमआरच्या सीरोलॉजिकल सर्वेक्षणात देशातील 70 जिल्हय़ांमधील सुमारे 24 हजार लोकांचे नमुने प्राप्त करण्यात आले होते. सीरो सर्वेक्षणत विशिष्ट अँटीबॉडीजची ओळख पटविण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले जातात. आयजीजी अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी ही चाचणी करण्यात आली होती. ही अँटीबॉडीज सार्स-कोव-2 शी लढते. संसर्ग 14 दिवस राहिल्यावर शरीरात अँटीबॉडीज शरीरात मिळू लागते आणि कित्येक महिन्यांपर्यंत ब्लड सीरममध्ये त्याचे अस्तित्व राहते. अत्याधिक रुग्ण आढळून आलेल्या जिल्हय़ांच्या अनेक कंटेन्मेंट झोन्समध्ये 15 ते 30 टक्के लोकसंख्येला ससर्ग झाल्याचे आयसीएमआरला आढळून आले आहे. स्पेनमध्येही सीरोलॉजिकल सर्वेक्षणात लाखो लोकांच्या रक्तनमुन्यात अँटीबॉडीज आढळून आली आहे.
आकडेवारीतून खरे चित्र नाही
आयसीएमआर 8 जिल्हय़ांमधील सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्राप्त करणार आहे. तर उर्वरित जिल्हय़ांच्या डाटानुसार अनेक कंटेन्मेंट झोन्समध्ये इन्फेक्शन साइज तेथे आढळून आलेल्या रुग्णांच्या 100 ते 200 पटीने अधिक आहे. यात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि इंदोर यासारखी शहरे आहेत. नोंद रुग्णांपेक्षाही अधिक लोकसंख्येत कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये विषाणूचा प्रसार कमी राहिल्याचे आयसीएमआरच्या अहवालात म्हटले गेले आहे.
सीरो सर्वेक्षण म्हणजे काय?
रक्तनमुन्यांची अँटीबॉडी चाचणी अत्यंत महत्त्वाची माहिती पुरविते. या चाचणीतून शरीरातील अँटीबॉडीजचा शोध लागतो. या अँटीबॉडीमुळे संबंधित व्यक्तीला संसर्ग झाला होता की नाही हे स्पष्ट हेते. संसर्गाच्या विरोधात लढण्यास मदत करणाऱया प्रोटीन्स म्हणजेच अँटीबॉडीज असतात. सीरो सर्वेक्षणासाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ वायरोलॉजीने निर्माण केलेल्या कोविड कवच एलिसा किट्सचा वापर करण्यात आला आहे.