महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक नियुक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करूनही हॉटेल चालक आणि व्यावसायिक रात्रीच्या वेळी कचराकुंडित कचरा टाकत आहेत. सूचना करूनही हा प्रकार सुरूच असल्याने कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने पथकाची नियुक्ती केली आहे. हॉटेलचा कचरा टाकण्यात येणाऱया ठिकाणी हे पथक तैनात करून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
हॉटेलमधील मांसाहारी व शाकाहारी कचरा रस्त्याशेजारी टाकण्यात येवू नये अशी सूचना वारंवार करण्यात येते. तसेच हॉटेलमधील कचऱयाची उचल करण्यासाठी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी देखील कचराकुंडीमध्ये कचरा टाकण्यात येत आहे. हॉटेलमधील कचरा टाकणाऱयांवर कारवाई करण्याचा बडगा उगारण्यात आला होता. पण रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मांसाहारी कचरा कुंडीत व रस्त्या शेजारी टाकण्यात आल्याने भटकी कुत्री व जनावरे हा कचरा पसरवत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. काहीवेळा हा कचरा गटारीत पडत असल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास देखील अडचण निर्माण होत आहे.
ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच कचरा टाकू नये असे फलक देखील लावण्यात आले आहेत. पण नागरिक दिवसा कचरा टाकण्याऐवजी रात्रीच्या वेळी कचरा टाकत आहेत. त्यामुळे महापालिकेला कारवाई करणे कठिण बनले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवण्यात येत आहे. पण हॉटेलमधील कचरा देखील या ठिकाणी टाकला जात असल्याने याची माहिती मिळत नाही. त्यामुळे कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. हॉटेलचा कचरा टाकण्यात येणाऱया ठिकाणी पथकाची नियुक्ती करून कचरा टाकणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. सदर मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात येणार असून, रस्त्याशेजारी आणि कचराकुंडीत हॉटेलमधील कचरा टाकणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.