नगरसेवक महेश आमोणकर यांचा दावा
प्रतिनिधी/ मडगाव
आमची साळ नदी, जी दीड-दोन दशकांपूर्वी अतिशय स्वच्छ आणि सुंदर होती, ती आता पूर्णपणे दूषित झाली आहे आणि त्या नदीचे पाणी काळ्या तेलासारखे झाले आहे व त्याला दुर्गंधी येत आहे. मडगाव, फातोर्डा आणि एसजीपीडीए घाऊक बाजारातील वेगवेगळी हॉटेल्स गटारात सांडपाणी सोडत असल्याने ही नदी प्रदूषित झाली आहे, असा दावा मडगाव पालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी केला आहे. सांडपाणी निचरा व्यवस्था थेट गटार, नाल्यांना जोडली जाते. नाल्यांतून सांडपाणी नदीला मिळत असल्याने नदीचे पात्र प्रदूषित होते, असे ते म्हणाले.
मडगाव पालिकेने सर्व हॉटेल्स व सर्व निवासी सोसायटय़ा तसेच रहिवासी भागांत पाहणी करून ज्यांनी भू-गटाराची जोडणी घेतलेली नाही त्यांच्या विरोधात अतिशय सक्रियपणे पावले उचलावीत. हॉटेल्सना व सर्व निवासी भागांत भू-गटार जोडणी सक्तीने घ्यावी अन्यथा पाण्याची जोडणी तोडली जाईल, असा इशारा द्यावा. भू-गटाराची जोडणी घेऊन या विविध स्रोतांतून दूषित सांडपाणी नदीत मिसळण्याचे प्रकार थांबवून आम्हीच आपली साळ नदी वाचवू शकतो, याकडे नगरसेवक आमोणकर यांनी लक्ष वेधले आहे.
मडगावचे आमदार दिगंबर कामत व नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या विषयावर आवश्यक ती कार्यवाही करावी आणि साळ नदीजवळील ठिकाणी भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घ्यावा तसेच आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱयांना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ही साळ नदी आपल्या प्रभाग 15 मधून वाहते. येथील पात्रातील पाण्याला येणाऱया दुर्गंधीमुळे माझ्या प्रभागातील अनेक रहिवासी आधीच अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. एके काळी या नदीतून कौले पुरवण्यासाठी काही जहाजे येत असत असे आम्ही ऐकले होते. मात्र आताची स्थिती दयनीय असल्याने काळजी करण्याची गरज आहे. प्रदूषित नदीचे पर्यावरणावरही विपरित परिणाम दिसून येत आहेत, असे आमोणकर यांनी म्हटले आहे.