तलवार, चाकू व दांडक्याच्या धाकाने 80 हजारांची रोकड लंपास
प्रतिनिधी/ सातारा
गोडोली (सातारा) प्रसिद्ध हॉटेल मराठा पॅलेसवर चार अज्ञात इसमांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यामध्ये तलवार, चाकू व दांडक्याचा धाक दाखवून काऊंटर व लोखंडी कपाटातील 80 हजार रुपयांची रोकड चोरटय़ांनी लंपास केली. याप्रकरणी महेश अंकुश मोरे (वय 28, रा. भुडकेवाडी ता. पाटण, जि. सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोडोली येथील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये सोमवार दि. 3 रोजी पहाटे 3.40 वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरटय़ांनी प्रवेश केला. यामध्ये दोघांनी महेश मोरे यांना तलवार, चाकू व दांडके या शस्त्रांचा धाक दाखवून जबरदस्तीने गादीवर बसविले. तर अन्य दोघांनी रिसेप्शन काउंटरचे दोन्ही ड्रॉवर व अकाउंट सेक्शनमधील लोखंडी कपाटचे लॉकर लोखंडी गजाने उचकटले व त्यातील 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
याप्रकरणी महेश मोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून चार अनोळखी चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.
डिटेक्शन होतंय मग प्रतिबंध केव्हा ?
नविन वर्षात सातारा शहर व परिसरात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. जबरी चोरी, दरोडे, किरकोळ चोऱया माऱया अशा घटनांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यामध्ये गोडोली परिसरातच अज्ञात चोरटय़ांनी मुद्रांक कार्यालय फोडून 57 हजारांची रोकड लंपास केली होती तर सदरबझार येथील बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलुप तोडून जवळपास 22 तोळे सोने चोरटय़ांनी लंपास केले होते. अशा घटना वाढतच चालल्या आहेत. पोलिसांनी गुह्यांच्या तपासाकडे लक्ष घातले असले तरी ते थांबविण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे डिटेक्शन होतय मग प्रतिबंध केव्हा ? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.