अनेक विद्यार्थ्यांनी गाठले आपले गाव : घरी जाण्यासाठी सुरू होती धडपड
प्रतिनिधी / बेळगाव
शाळा-महाविद्यालयांतील हॉस्टेल्स बंद करण्यात आली आहेत. शाळा-महाविद्यालये बंद झाली. याचबरोबर क्लोजडाऊन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या गावी परतु लागले आहेत. अत्यंत नाराज होऊन विद्यार्थी आपापल्या गावी परतताना दिसत आहेत.
कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटलीच आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक वर्ग बंद करण्यात आले आहेत. काही प्रमाणात सुरू असलेले शैक्षणिक वर्गही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आले आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर काही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थीवर्ग अडचणीत आला आहे.
पुढील निर्णयावरच विद्यार्थ्यांचे भवितव्य दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे अनेक महाविद्यालयांतील हॉस्टेल्स बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अभ्यास असला तरी विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले आहे. बुधवार दि. 28 पासून क्लोजडाऊन असल्यामुळे मंगळवारीच अनेक विद्यार्थी आपापल्या घरी परतले आहेत. त्यामुळे बसस्थानकांवर गर्दी दिसून आली. आता तब्बल 10 तारखेनंतर पुढील निर्णयावरच विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.