बेळगाव शहरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी हे बाहेरगावाहून शिक्षणासाठी आले आहेत. त्यांच्या सोयीसाठी सरकारी अथवा खासगी हॉस्टेल्स ठिकठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जीवनात प्रत्येकाने एकदा का असेना पण हॉस्टेल लाईफ जरुर अनुभवली पाहिजे. असे मत कोणत्या महान पुरुषाचे नसून हॉस्टेलमधून बाहेर पडलेल्या एका हॉस्टेल विद्यार्थ्याचे आहे. घरापासून दूर राहून येणाऱया सुख- दुःखांना सामोरे जात हॉस्टेलची खरी दुनिया काय असते, हा अनुभव वेगळाच असतो. मात्र हॉस्टेल्स लाईफ एन्जॉय करताना काही दक्षता घेणेही गरजेचे आहे.
घरापासून लांब राहून अभ्यासात मन रमवणे, हॉस्टेलचे नियम काटेकोरपणे पाळणे अशी कडक मात्र आनंददायी आयुष्य जगण्याची पायवाट ही फक्त हॉस्टेलमध्येच सापडते. घरच्यांपासून दूर स्वतंत्रपणे रहायला मिळतं या विचारानेही काहीजण हॉस्टेल लाईफची निवड करतात. एकंदरच हॉस्टेलमध्ये राहणाऱयांसाठी हॉस्टेल हेच त्यांचे दुसरे घर होऊन जाते. मित्र-मैत्रिणींसोबत थट्टा, मस्करी, मज्जा मस्ती अशा वातावरणात दिवस कसे आणि कधी निघून जातात, हे कळतच नाही. काहीजण तर आपला हा हॉस्टेल दुनियेचा प्रवास दररोज डायरीमध्ये साठवून ठेवतात.
हॉस्टेल जगत हे प्रत्येकासाठी काहीतरी वेगळेपण घेऊन येणारे असते. स्वतःचे कपडे स्वतः धुणे, मेसमध्ये स्वतःच्या हातांनी धुवावे लागणारे ताट, घरामध्ये नावडत्या भाजीला अथवा पदार्थांला खाताना केले जाणारे नखरे या हॉस्टेलमध्ये येऊन नाहीसे होतात. नावडती भाजीही इथे आवडती होते, अंथरुणाची रोजची आवराआवर, स्वतःची कामे स्वतः करणे याची चांगली सवयही हॉस्टेलमध्ये लागते.
नियमांचे पालन
नियमांचे पालन करणे, रात्री उशिरा येऊ नये, नियमांचे उल्लंघन केल्यास पालकांशी याबाबत चर्चा करणे, जेवणाच्या ठरलेल्या वेळेत जर तुम्ही काही कारणास्तव नाही पोहोचू शकला तर जेवण न मिळणे असे अनेक नियम इथे लागू असतात. मात्र या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन विद्यार्थी आपले हे जग आनंदात जगत असतात. मोबाईलचा वापर टाळणे, काही ठराविक वेळेतच पालकांशी बातचीत करणे, बाहेरच्या व्यक्तींशी अधिक संपर्क न ठेवणे आदी गोष्टी पाळल्या पाहिजे.
मित्रांशी तासन्तास गप्पा गोष्टी करणे, हॉस्टेल कँपसमध्ये खेळले जाणारे खेळ व तेथील वातावरण यामध्ये विद्यार्थी आपोआप मिसळून जातात. हॉस्टेल लाईफ हेच त्यांच्यासाठी घर होऊन जाते. रात्रभर बसून ग्रुप स्टडीज करणे, रात्रीच्या वेळी हळूच चहा पिण्याचा बेत काहीजणांकडून आखला जातो. काहीवेळा तर रात्री अपरात्री गाणी व डान्स करण्याचे बेतही गच्चीवर आखले जातात.
अलर्ट राहणे गरजेचे
हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी ऑल टाईम अलर्ट राहतात. कारण त्यांच्याजवळ असणाऱया किमती वस्तु सांभाळण्याची जबाबदारी ही त्यांची स्वतःचीच असल्याने ऑल टाईम अलर्ट राहणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. याशिवाय टाईम टू टाईम उठणे, झोपणे, कोणी अनोळखी व्यक्ती स्वतःच्या खोलीत घुसणार नाही, याची पहाणीसुध्दा स्वतःची स्वतःच करावी लागते.
मनी मॅनेजमेंट
घरातून मिळालेल्या पैसे महिनाभर राखून ठेवावे. कोणताही वायफळ खर्च केल्यास आपल्याला पैसे कमी पडतील का? याचे बजेट आपल्याला हॉस्टेलमध्ये आल्यानंतरच कळते. अशी हॉस्टेल लाईफ प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरते.
सध्या प्रत्येकालाच आपले जीवन आपल्या पद्धतीने जगावे असे वाटते. स्वातंत्र्य मिळावे आपला अभ्यास चांगल्यारित्या पूर्ण व्हावा म्हणून काहीजण घरांपासून लांब हॉस्टेलमध्ये राहणे पसंत करतात. मात्र हजारो विद्यार्थी वाईट मित्रांच्या संगतीने व्यसनांना बळी पडत आहेत, हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीच्या व्यसनांच्या आहारी न जाता आपली मर्यादा जाणून मिळालेल्या मोकळेपणाचा चांगला उपयोग करावा.
शिवानी पाटील