श्रीपादभाऊंचे चाहत्यांना आवाहन प्रकृतीमध्ये झाली चांगली सुधारणा खुल्या हवेत साधला पत्रकारांशी संवाद
प्रतिनिधी / पणजी
केंद्रीय आयुषमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपादभाऊ नाईक यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली असून ते आता व्हिल चेअरवरून फिरू लागले आहेत. त्यांना येत्या चार-पाच दिवसात बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली असून भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येऊ नये, असे आवाहन केले आहे. चार पाच दिवसांनी आपणच सर्वांना भेटणार असल्याचे निवेदनही त्यांनी केले आहे.
त्यांच्या या आवाहनाचा व्हिडीओ प्रसारित झाला असून त्यात ते व्हिल चेअरवरून इकडून तिकडे फिरताना आणि बोलताना दिसत आहेत. अपघातात जखमी झाल्यानंतर सुमारे आठवडाभर उपचार घेऊन काल मंगळवारी प्रथमच ते बोलते झाले.
श्रीपादभाऊंनी मोकळय़ा हवेत घेतला श्वास
हॉस्पिटलमधील वॉर्डमधून बाहेरच्या खुल्या हवेत येऊन त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नऊ दिवसांनंतर त्यांनी मोकळय़ा हवेत श्वास घेतला. मला भेटण्यासाठी लोकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन गर्दी करू नये, असे विनम्रतेने ते म्हणाले. हॉस्पिटलमधून घरी पाठवल्यावर आपण सर्वांना भेटतो, असा संदेश त्यांनी दिला आहे.
बऱयाच दिवसांनी मी सूर्य प्रकाश पाहिला
बऱयाच दिवसांनी मी सूर्य प्रकाश पाहिला. देवाचे कृपार्शीवाद आणि तुम्हा सर्वांच्या प्रार्थनामुळे आज मी ठीक होतोय. मी येत्या काही दिवसांत तुम्हा सर्वांना निश्चितच भेटणार आहे. मला आज प्रथमच मोकळय़ा हवेत आणण्यात आले. याचा अर्थ माझ्या स्वास्थ्यात झपाटय़ाने सुधारणा होत आहे, असे श्रीपादभाऊंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कर्नाटकातील भीषण अपघातात जखमी
धर्मस्थळ येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून सोमवार दि. 11 रोजी सांयकाळी गोव्यात परतत असताना गोकर्णनजीक श्रीपादभाऊ नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. त्याच दिवशी त्यांना तातडीने गोव्यात आणून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्या दिवसापासून ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार घेत आहेत.
याच अपघातात त्यांच्या पत्नी सौ. विजयावहिनी तसेच त्यांचे स्वीय सचिव डॉ. दीपक घुमे यांचा मृत्यू झाला होता.
गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नाईक यांच्या सर्व चाचण्यांचे अहवाल चांगले आणि योग्य त्या पातळीवर आहेत. त्यांचा रक्तदाब, साखर व इतर पातळी सर्वसाधारण असून त्यांचे खाणे-पिणे चालू झाल्यामुळे जखमाही आता भरून आल्या आहेत.
.पंतप्रधानांकडून श्रीपादभाऊंची दुसऱयांदा विचारपूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंळवारी दुसऱयांदा आयुषमंत्री तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि जलद स्वास्थ्य लाभावे यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी श्रीपादभाऊ यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. पंतप्रधानांनी त्यांना आरोग्याविषयी विचारणा केली आणि लवकर बरे व्हा, असे सांगितले. यावेळी गोव्यातील आणि देशभरातील लोकांच्या आणि देवाच्या आशीर्वादामुळे आज आपण सूर्य पाहिला असे, श्रीपादभाऊंनी पंतप्रधानांना सांगिले.