प्रतिनिधी /बेळगाव
औद्योगिक वसाहतीत बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती करता यावी, या उद्देशाने हेस्कॉमने होनगा येथे 24 तास तक्रार निवारण वाहन दिले आहे. नुकताच या वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये बिघाड झाल्यास ग्राहकांना तात्काळ सेवा दिली जाणार आहे. या सेवेमुळे उद्योजकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हेस्कॉमकडून ज्या-ज्या ठिकाणी ग्राहकांची संख्या अधिक आहे त्या-त्या ठिकाणी 24 तास तक्रार निवारण वाहन दिले जाते. यापूर्वी बेळगाव शहर विभागात वाहने देण्यात आली होती. मच्छे व उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीला वाहन दिल्यानंतर आता होनगा येथेही एक वाहन देण्यात आले आहे. यामध्ये शिडीची व्यवस्था असल्याने कुठेही दुरुस्ती केली जावू शकते. तसेच 4 अतिरिक्त कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. होनगा व काकती परिसरात कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सुरळीत व चांगल्या दर्जाचा वीजपुरवठा करणे हेस्कॉमची जबाबदारी आहे. यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते या वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंते विवेक नाईक, साहाय्यक कार्यकारी अभियंते वैशाली तुयेकर आदी उपस्थित होते.