खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे ग्रामपंचायतला भेटीप्रसंगी आश्वासन
वार्ताहर / काकती
होनगा परिसरातील समस्या जाणून घेऊन विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा विश्वास खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिला.
होनगा गावच्या विकासकामांचा आढावा घेण्याकरिता ग्रामपंचायतीला त्यांनी नुकतीच भेट दिली. ग्रामस्थांच्यावतीने ऍड. विजय होनमनी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यकर्ते बसवराज चचडी, नाना टक्केकर, आनंद रा. पाटील, बाळू कणबरकर, ग्रा. पं. सदस्य रवी कणबरकर आदींनी गावच्या समस्या व विकासकामे पूर्ण करण्यासाठी निवेदन दिले.
या निवेदनात प्रमुख समस्या सोडविण्यासाठी बेन्नाळीकडील मोनेश्वर नगरकडील मोनेश्वर मंदिर पक्का रस्ता करण्याकरिता सर्व्हे नंबरची मोजणी करणे, सर्व्हिस रोडवरील घर कोसळून मातीचा ढिगारा पडला असून तो हटवून रस्ता मोकळा करणे, सरकारी मराठी शाळेची दूरवस्था झाली असल्याने या पावसाळय़ात अनेक ठिकाणी वर्गखोल्यांतून पाणी गळत आहे, याची दुरुस्ती करणे, येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सर्व्हिस रस्त्यात साचत असल्याने मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. भैरवनाथ मंदिर ते सायबाचे कौल हा शिवारातील रस्ता पक्का करणे व सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी या रस्त्याच्या बाजूने गटार बांधणे तर सरकारी मराठी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी रंगमंदिर सभागृह बांधणे आदी विकासकामे करण्याची मागणी केली आहे.
यावेळी होनगा ग्राम विकास अधिकारी सुमित्रा मिर्जी, भाजप नेते रवी हंजी, बसवराज हुंदरे, यमकनमर्डी विभाग अध्यक्ष आप्पय्या झाजरी, नागेश बांडगे, वैजू पावशे, यल्लाप्पा गिणगिणे व ग्रामस्थ उपस्थित होते.