वार्ताहर /काकती
होनगा ग्राम पंचायतीचा कारभार पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख करण्यासाठी या ग्रा. पं. ने पुढचे पाऊल उचलले आहे. नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी लागणाऱया दरपत्रक बॅनरचे अनावरण ग्रा. पं. अध्यक्ष विजय व्हनमणी व ग्रा. पं. सदस्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमात ग्राम विकास अधिकारी सुमित्रा मिर्जी यांनी स्वागत केले. ग्रा. पं. अध्यक्ष विजय व्हनमणी प्रास्ताविकात म्हणाले, सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या विश्वासावर ग्रा. पं. चा कारभार चालवत आहोत. गावचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता भ्रष्टाचारमुक्त आणि उत्तम कारभाराशिवाय पर्याय नाही. प्रामाणिकपणा केवळ उत्तम धोरण नव्हे तर उत्तम राजकारणदेखील आहे. याचा विसर लोकप्रतिनिधींना पडू देऊ नये, असे आवाहन करून पुढे म्हणाले, नागरिक, महिलांना तत्पर सेवा देणे सामान्य जनतेची ग्रा. पं. होनगा अशी ओळख निर्माण करून द्यायची आहे. याकरिता ग्रा. पं. च्या सेवा दरपत्रकाचे पारदर्शक व्यवहारासाठी विकासाचे पुढचे पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन केले.
होनगा ग्रा. पं. ने हाताने लिहिलेला घरचा उतारा मोफत ठेवला आहे. तर संगणकीय उतारा 50 रु., एनओसी प्रमाणपत्रासाठी 250 रु. लहान व्यवसायिक परवाना रु. 250, घरचा वारसा करण्यासाठी 1000 रु, चहा हॉटेल परवाना 2000 रु. अशा विविध परवानासाठी ठरविलेली फी भरून पावती देण्याची सोय करण्यात आली आहे. तर रोजगार हमी योजनेतील कामे, हजेरी, गरजूंना काम मिळवून देणे असा स्वच्छ कारभार ग्रा. पं. च्यावतीने राबविण्यात येत आहे.
यावेळी माजी ग्रा. पं. अध्यक्ष सिदाप्पा नाईक, ग्रा. पं. सदस्य प्रतिक सांबरेकर, रवि कणबरकर, दुर्गव्वा जालण्णवर, तलाठी बसाप्पा नाईक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. सेक्रेटरी मलप्रभा यांनी आभार मानले.