वृत्तसंस्था / सिडनी
11 व्या बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेतील सामन्यात मॅथ्यू वेडच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर होबार्ट हरिकेन्सने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे सिडनी सिक्सर्सचा 44 धावांनी पराभव करत शानदार विजय मिळविला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना होबार्ट हरिकेन्सने 20 षटकात 2 बाद 213 धावा झळकविल्या. त्यानंतर सिडनी सिक्सरने 18 षटकात 4 बाद 151 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 44 धावांनी गमवावा लागला. पावसाच्या अडथळय़ामुळे सिडनी सिक्सर्सला पंचांनी विजयासाठी 18 षटकांत 196 धावांचे नवे उद्दिष्टय़ दिले होते.
होबार्ट हरिकेन्सच्या डावात सलामीचा फलंदाज आणि कर्णधार मॅथ्यू वेडने 46 चेंडूत 5 षटकार, 9 चौकारांसह 93 धावा तर शार्टने 51 चेंडूत 5 षटकार, 4 चौकारांसह नाबाद 73 धावा झळकविल्या. वेड आणि शॉर्ट या सलामीच्या जोडीने 11.2 षटकांत 111 धावांची भागीदारी केली. वेड बाद झाल्यानंतर शॉर्ट आणि ज्वेल यांनी दुसऱया गडय़ासाठी 92 धावांची भर घातली. ज्वेलने 23 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 42 धावा जमविल्या. होबार्ट हरीकेन्सच्या डावात 9 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. सिडनी सिक्सर्सतर्फे टॉम करेन आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल सिडनी सिक्सर्सने 18 षटकांत 4 बाद 151 धावांपर्यंत मजल मारली. सलामीच्या फिलीपीने 46 चेंडूत 3 षटकार आणि 6 चोकारांसह 72, व्हिन्सेने 22 चेंडूत 2 चौकारांसह 26, कर्णधार हेन्रीक्सने 25 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 26, ख्रिस्टेनने 9 चेडूत 2 चौकारांसह 12, हय़ूजेसने 2, टॉम करेनने 3 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 6 धावा केल्या. सिडनी सिक्सर्सच्या डावात 3 षटकार, 13 चौकार नोंदविले गेले. होबार्ट हरिकेन्सतर्फे पॅरिसने 26 धावांत 3 तर इलिसने 37 धावांत 1 गडी बाद केला. सिडनी सिक्सर्सचा या स्पर्धेतील गेल्या तीन सामन्यांतील हा पहिला पराभव आहे.
संक्षिप्त धावफलक
होबार्ट हरिकेन्स 20 षटकात 2 बाद 213 (मॅथ्यू वेड 93, शॉर्ट नाबाद 73, ज्वेल 42, टॉम करण 1-46), सिडनी सिक्सर्स 18 षटकात 4 बाद 151 (फिलीपी 72, हेन्रीक्स नाबाद 26, पॅरिस 3-35).