बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर
कोणत्याही बंदोबस्तात पोलिसांना मदत म्हणून होमगार्डस ( गृहरक्षक दल) जवान रस्त्यावर थांबतात. मात्र मानधन वेळेत मिळाले नाही तर होमगार्डस जवानांची आर्थिक ओढाताण होते. गेल्या तीन बंदोबस्ताचे मानधन प्रलंबित असून त्यांचे लक्ष मानधनाकडे लागले आहे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महापूर, राजकीय नेत्यांचे दौरे, मोर्चा, आंदोलनावेळी पोलिसांबरोबर होमगार्ड जवानांना बंदोबस्तासाठी नियुक्त केले जाते. पोलिसांना होमगार्डसची मोठी मदत होऊन पोलीस यंत्रणेवरचा ताण काहीसा हलका होतो. पण होमगार्डसना निश्चित वेतन न मिळता बंदोबस्त असेल त्यावेळी मानधन दिले जाते. त्यातही आलटून -पालटून डÎुटी मिळत असल्याने वर्षातील काही दिवसच काम मिळून फक्त त्या दिवसाचे मानधन मिळते. त्यातही ते तुटपुंजे असल्याने सद्याच्या महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे मुश्किल बनत आहे.
जिल्हÎात 1852 होमगार्ड आहेत. कोरोना काळात जवळपास दोन वर्षे या जवानांनी सेवा बजावली. यानंतर जुलै 2021 मध्ये कोरोना बंदोबस्तासाठी 500 जवान तैनात केले होते. त्यानंतर बकरी ईदसाठी तीन दिवस 720 जवान तर महापूराच्या काळात पाच दिवस 500 जवान रस्त्यावर होते. अशा 1720 जवानांचे 26 दिवसाचे 84 लाख 1,800 रुपये इतके मानधन थकित आहे. ऑगस्ट महिना संपला तरी त्यांना मानधन मिळाले नाही. यामुळे आर्थिक ओढाताण होत आहे. या महिन्यात तरी आम्हाला पैसे मिळतील का अशी विचारणा होमगार्डस जवान करत आहेत.
मुख्यालयाकडे मानधनाची मागणी-
होमगार्डसच्या प्रलंबित मानधनाबाबत जिल्हा समादेशक कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱयांनी जुलै महिन्यातील बंदोबस्ताचे 84 लाख रुपये मानधन थकित असून मानधन मागणीची महासमादेशक मुंबई कार्यालयाकडे केली असल्याची माहिती दिली.
शासनाकडून मानधन आल्यावर दोन दिवसात मिळेल
जिल्हÎातील होमगार्ड जवानांचे बंदोबस्ताचे मानधन त्यांना वेळेत मिळणे महत्वाचे आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून पाठपुरावा सुरु आहे. उपसचिव यांच्याशी चर्चा झाली आहे. शासनाकडून मानधन आल्यावर जवानांना दोन दिवसात मिळेल – जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक, गृहरक्षक दल
होमगार्ड संख्या- 1852
पुरुष -1657
महिला – 195
मानधन – प्रतिदिन – 670
प्रलंबित मानधन –
कोरोना बंदोबस्त -14 ते 31 जुलै – 18 दिवस
बकरी ईद बंदोबस्त – 20 ते 22 जुलै – 03 दिवस
महापूर बंदोबस्त -24 ते 28 जुलै -05 दिवस
होमगार्डस जवान मानधन प्रलंबित संख्या- 1720
मानधन थकित – 84 लाख 1,800