प्रतिनिधी/ बेळगाव
पोलीस, डॉक्टर यांच्याप्रमाणेच पत्रकारसुद्धा लॉकडाऊनच्या काळात कार्यरत आहेत. त्यांच्या आरोग्याची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. याच हेतूने बेळगावच्या खासगी होमिओपॅथी कॉलेज संघ, होमिओपॅथी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबीयांना ‘आर्सेनिक अल्बम 30’ या औषधाचा डोस देण्यात आला. माहिती व प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयात हा कार्यक्रम मंगळवारी सकाळी 10.30 वा. झाला.
माहिती व प्रसिद्धी खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी सर्वांचे स्वागत केले. पत्रकारांच्या कार्याची जाणीव विविध संस्था ठेवत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी 30 हून अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना औषधाचा डोस देण्यात आला. तो कसा घ्यावा याबद्दल डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भरतेश होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोकणी, शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. आनंद होसूर, केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. मुकुंद उडचणकर, ए. एम. शेख होमिओपॅथिकचे डॉ. गिरीश मोघी व होमिओपॅथिक संघटनेच्या बेळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. बसवराज, तसेच जिल्हा आयुष अधिकारी डॉ. दोदवाड व श्रीकांत सुमगोळी उपस्थित होते.