आरोग्य खात्याकडून आदेशपत्रक जारी
बेंगळूर : राज्यात कोरोनाची लक्षणे नसणारे पॉझिटिव्ह रुग्ण आणि सौम्य लक्षणे असणाऱयांना घरातच राहून फोनद्वारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांचा सल्ला घेऊन उपचार घेण्याची सशर्त मुभा आरोग्य खात्याने दिली आहे. आरोग्य खात्याने मंगळवारी होम आयसोलेशन संबंधीची मार्गसूची जारी केली आहे. राज्यातील इस्पितळे कोविड रुग्णांनी भरली आहेत. त्यामुळे रुग्णांना बेडची कमतरता भासत आहे. कोरोनाची लक्षण गंभीर नसणारे रुग्णसुद्धा इस्पितळात दाखल होत आहेत. त्यामुळे गंभीर स्वरुपाच्या कोरोना रुग्णांना अत्यावश्यक चिकित्सेपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने होम आयसोलेशन संबंधीची मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार कमी ताप (38 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी), ऑक्सिजनची पातळी 95 पेक्षा अधिक असणाऱया कोरोनाबाधितांना होम आयसोलेशनमध्ये राहता येणार आहे. त्यासाठी घरातच स्वतंत्र खोली आणि रुग्णाची देखभाल करण्यासाठी एका व्यक्तीची उपलब्धता असावी. ही व्यक्ती अन् इस्पितळ यांच्यात सातत्याने संपर्क असावा, असे मार्गसूचीत नमूद आहे.
गर्भवती, गंभीर आजारी असणाऱयांना कठोर नियम
60 वर्षावरील व्यक्ती, मधुमेह, हृदयरोग, श्वसनासंबंधी विकार, मुत्रपिंड, यकृत आणि इतर गंभीर आजार असणाऱयांना तपासणी करून वैद्यकीय अधिकारी व फॅमिली डॉक्टरच्या परवानगीने होम आयसोलेशनमध्ये उपचार घेता येणार आहे. याशिवाय प्रसूतीसाठी दोन आठवडे असलेल्या कोरोनाबाधित गर्भवतींना होम आयसोलेशनमध्ये उपचार घेता येणार नाही.