छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात मात्र, उपचारांपुर्वीच मृत्यू
प्रतिनिधी/ दापोली
मुबईतील घाटकोपर येथून दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे आलेल्या व होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या वृद्धाचा गुरुवारी रात्री दापोली येथे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले आहेत.
संबधीत वृद्ध 22 मार्च रोजी मुंबईतील घाटकोपर येथून बुरोंडी येथील घरी आला होता. त्याचे कुटुबीय मुंबइं&तच आहेत. त्याची तपासणी करून आरोग्य विभागाने त्यांना होम क्वॉरंटाईनचा सल्ला देत त्याच्या हातावर तसा शिक्का मारला होता. गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्यांना दापोली येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र उपजिल्हा रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या व्यक्तीच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का असल्याने लगेचच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. शासकीय यंत्रणेची रात्रभर चांगलीच धावपळ उडाली. या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून मृत व्यक्तीच्या स्वबचा नमुना मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच सदर व्यक्ती कोरोनाग्रस्त होती की नाही याबाबतचा उलगडा होणार आहे.
दरम्यान या व्यक्तीला रात्री उपचारासाठी दापोली शहरात घेऊन आलेल्या 10 ग्रामस्थांना खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शेतकरी निवास येथील क्वॉरंटाईन कक्षात दाखल करण्यात आले आहे. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णायात दाखल करण्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत्यू कशाने झाला? हे नेमके कळू शकलेले नाही, मिरज येथून अहवाल आल्यावरच मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवा बिरादार यांनी सांगितले.
शेजारीदेखील अडकले
या व्यक्तीच्या छातीत दुखू लागल्यामुळे शेजाऱयांनी दापोलीतील रूग्णालयात त्यांना आणले. मात्र या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने व त्याच्या हातावर होम कोरोनटाइनचा शिक्का असल्याने उपचारासाठी घेऊन येणाऱयांनाही खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. संबधीत व्यक्ती ज्यांच्याकडे जेवणासाठी जात होती त्या कुटुंबाला देखील होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या व्यक्तीला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच त्यांच्या पायाला जखम देखील झाली होती. ही व्यक्ती मुंबईला जाण्याआधी वडाप व्यवसाय करत होती अशी माहिती स्थानिकांनी दिली.
ग्रामपंचायतीने केली तातडीने फवारणी
संबधीत वृद्धाच्या मृत्यूनंतर बुरोंडी ग्रामपंचायतीने नगरपंचायतीच्या मदतीने गावात शुक्रवारी सकाळीच जंतुनाशक औषधाची फवारणी करून घेतली. या व्यक्तीची होम कोरोन्टाइनची मुदत संपलेली असून त्याला कोरोन संबधीत कोणतीही लक्षणे आढळलेली नव्हती. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू अन्य कारणांनी झाला असावा अशी शक्यता प्रशासनातील सुत्रांनी व्यक्त केली आहे. अहवाल आल्यानंतरच याबाबतची स्पष्टता होईल पण कोणीही घाबरून जाऊ नये, अफवा पसरवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.