मालवण येथील युवतींना आला अनुभव
प्रतिनिधी / मालवण:
मुंबईहून ई-पास घेऊन सिंधुदुर्गात चाकरमानी येत आहेत. शनिवारी मुंबईहून मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात एक युवती आली. खारेपाटण तपासणी नाक्यावर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. मात्र, या शिक्क्याचे इन्फेक्शन होऊन तिच्या हातावर फोड येऊन काळा डाग झाला आहे. त्यामुळे युवती घाबरल्या आहेत. क्वारंटाईन शिक्क्यासाठी नेमके कोणते केमिकल वापरले जाते, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत असून याप्रकरणी युवतीच्या पालकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात चाकरमानी येत आहेत. या चाकरमान्यांची सिंधुदुर्गच्या सीमेवर खारेपाटण येथे तपासणी केली जाते. तपासणीनंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. असा शिक्का मालवण तालुक्यातील ग्रामीण भागातील युवतींच्या हातावर मारण्यात आला. शनिवारी रात्री हा शिक्का मारल्यानंतर त्या घरी गेल्या. त्यांनी हात पाहिल्यानंतर त्या घाबरल्या. होम क्वारंटाईनसाठी मारलेल्या शिक्क्याचे त्यांना इन्फेक्शन होऊन हातावर फोड आले. तसेच शिक्का मारलेल्या भागावर काळा डाग पडला.