जमैकाचे माजी आयसीसी पंच स्टीव्ह बकनर यांची दोन दशकानंतर कबुली
ब्रिजटाऊन / वृत्तसंस्था
चुका होणे हे मनुष्य स्वभावाचे लक्षण आहे. जवळपास 1 लाख चाहत्यांचा प्रचंड गोंगाट सुरु असताना काही चुका होणे स्वाभाविकही असते. पण, सचिनला दोनवेळा बाद नसताना मी बाद दिले आणि आजही मला त्या निर्णयांची मनापासून खंत वाटते, अशा स्पष्ट शब्दात माजी आयसीसी पंच स्टीव्ह बकनर यांनी आपल्या चुकांची जाहीरपणे कबुली दिली. बकनर यांनी सचिनला प्रारंभी 2003 मध्ये गब्बा कसोटीत व नंतर 2005 मध्ये ईडन गार्डन्स कसोटीत बाद नसतानाही बाद ठरवले आणि यामुळे सचिनसह भारतीय संघाचीही निराशा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर बकनर बोलत होते.
2003 मधील गब्बा कसोटीत जेसॉन गिलेस्पीच्या गोलंदाजीवर सचिनला पायचीत दिले, त्यावेळी रिप्लेत चेंडू यष्टीच्या बराच वर असल्याचे दिसून आले तर 2005 मधील कोलकाता कसोटीत अब्दूल रझाकच्या चेंडूवर सचिनला झेलबाद दिले, त्यावेळी चेंडू व बॅट यांच्यात बरेच अंतर असल्याचे रिप्लेत स्पष्ट झाले होते.
‘कोणत्याही पंचाला आपल्याकडून चूक व्हावी, असे अजिबात वाटणार नाही. कारण, झालेली अशी चूक सदैव त्याच्यासोबतच राहते आणि यामुळे त्या पंचांचे स्वतःची कारकीर्द देखील अडचणीत येऊ शकते’, असे बकनर याप्रसंगी म्हणाले. मॅसॉन अँड ग्वेस्टस रेडिओशी ते येथे बोलत होते.
‘ऑस्ट्रेलियात मी सचिनला पायचीत दिले, त्यावेळी चेंडू यष्टीच्या बऱयाच वर असल्याचे मला नंतर लक्षात आले. अगदी भारतातील कसोटीतही सचिनबाबत माझ्याकडून अशीच चूक झाली. पण, जेव्हा सामना ईडन गार्डन्सवर असतो आणि भारत फलंदाजी करत असेल तर तेथे काहीच ऐकू येत नसते’, अशा शब्दात बकनर यांनी आपली बाजू मांडली.
डीआरएसचा वापर रास्तच
बकनर यांनी यावेळी क्रिकेटमध्ये नवे तंत्रज्ञान अधिक कसोशीने राबवण्याबाबतही आपली भूमिका विशद केली. शिवाय, डीसिजन रिव्हय़ू सिस्टीम (डीआरएस) मुळे खेळ अधिक पारदर्शक झाला असल्याचे नमूद केले.
‘डीआरएसमुळे मैदानी पंचांचा आत्मविश्वास खचत असेल का, याची मला कल्पना नाही. पण, यामुळे पंचगिरी निश्चितच सुधारली आहे’, असे ते म्हणाले. ‘मी पंच म्हणून काम पाहत असताना संशयाचा फायदा फलंदाजांना देण्याची मोठी सोय होती. पण, आजच्या घडीला परिस्थिती बदलली आहे. आज निर्णयाविषयी साशंकता असल्यास खेळाडू डीआरएस घेऊ शकतात आणि रिप्ले पाहून निर्णयावर फेरविचार होऊ शकतो. अर्थात, ज्या पंचांना आपल्या निर्णयावर दाद मागितली जाणे पसंत नाही, किंवा आक्षेपार्ह वाटते, त्यांनी आपल्या जबाबदारीविषयी जरुर विचार करावा’, असे बकनर एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
थोडक्यात बकनर
पूर्ण नाव : स्टीफन अँथोनी स्टीव्ह बकनर
जन्म : 31 मे 1946 (वय 74)
टोपण नाव : स्लो डेथ बकनर
पंचगिरी
लिस्ट ए सामने : 221
वनडे : 181
कसोटी : 128
त्यावेळी बकनर रात्रभर बेचैन असायचे!
‘मी स्वतः ज्यावेळी पंचगिरी करत असे, त्यावेळी एखाद्या दिवशी चुकीचा निर्णय दिला आणि त्याची नंतर जाणीव झाली तर अक्षरशः रात्रभर मला झोप लागत नसे. पण, आता तशी परिस्थिती अजिबात नाही. आता एखादा निर्णय चुकीचा जरी दिला तरी त्यावर खेळाडू दाद मागू शकतात आणि रिप्ले पाहून निर्णयात चूक असेल तर ती दुरुस्त करता येते. तो पंच यामुळे निश्ंिचत राहू शकतो, ही दुसरी बाजू आहे’, याचा बकनर यांनी उल्लेख केला.