प्रतिनिधी/कागल
येथील होलिडेन स्कूलमध्ये सीबीएसईच्या इयत्ता नववी वर्गात शिकणारी कु.शार्वी रविकांत हुनुरे ही ‘परीक्षा पे चर्चा-2020’ या कार्यक्रमात नवी दिल्ली येथे सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः चर्चा करुन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.
मानव संसाधन विभाग भारत सरकारतर्फे ‘परीक्षा पे चर्चा-2020’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कु. शार्वीची निवड झाल्याचा मेल शाळेला कालच प्राप्त झाला आहे. 20 जानेवारी रोजी हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे होणार आहे.
फिट इंडिया स्कूल सर्टीफिकेट, फ्लॅग मानांकन मिळालेले होलिडेन स्कूल सर्व प्रथम आहे. त्याचबरोबर स्कूलची विद्यार्थीनी शार्वीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा होणार असल्याने शाळेमध्ये व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे स्कूलचे सीईओ प्राचार्य डॉ. जितेंद्र कोले यांनी सांगितले. कु. शार्वीला सौ. नेहा जोशी, सौ. काझी, सौ. देसाई, अबिद मुश्रीफ, मुजाहिद कोल्हापूरे, उदय पाटील, नागरगोजे व इतर सर्व शिक्कक आणि पालक रविकांत हुनुरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शार्वीला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, चाटे समूह संचालक डॉ. भारत खोराटे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.