प्रतिनिधी / ओटवणे:
केसरी गावात आत्मातंर्गत २५ शेतक-यांच्या १० एकर माडबागेत मिरी रोपे लागवड प्रात्यक्षिके घेण्यात आली. या मिरी लागवडीचा शुभारंभ मंडळ कृषी अधिकारी पी. एस. घाडगे, आत्मा बिटीएम मिनल परब व कृषीपर्यवेक्षक संदीप देसाई यांच्याहस्ते करण्यात आला. या मिरी लागवड कार्यक्रमासाठी केसरी गावातील शेतकरी होजगनाथ रामचंद्र सावंत, मनेश मुकुंद नाईक, रघुनाथ साबाजी सावंत यांच्या माड बागायातीची निवड करण्यात आली.
यावेळी पी एस घाडगे यांनी शेतक-यांना मिरी लागवड काळजी व देखभाल याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी कृषी मित्र प्रदीप सावंत तसेच गावचे कृषी सहाय्यक मिलिंद निकम, नागेश साखरे उपस्थित होते. हा कार्यक्रम क्लस्टर बेस असून १० एकरवरती घेण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्यातून २५ एकरचा एक क्लस्टर तयार करण्यात आला असून इतर मंडळात उर्वरीत क्षेत्रावर लवकरच मिरी लागवड प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे.