पुणे \ ऑनलाईन टीम
लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शनची तजवीज करुनही पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेंचे प्राण वाचू शकले नाहीत. १ ऑगस्टला सायंकाळाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास झाला. रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वेदिकावर उपचार करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगद्वारे १६कोटी रुपये जमा केले होते.
वेदिकाला झालेला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी हा एक जनुकीय आजार आहे. हा आजार आपल्या मुलीला झाल्याचे समजल्यानंतर तिचे आई वडील सुरुवातीला खचून गेले. मात्र त्यांनी हिंमत न हारता वेदिकावरील उपाचारांसाठी पैसे उभे करण्याचं ठरवलं. त्यांनी एक दोन नाही तर तब्बल १६ कोटींचा निधी जमा केला. क्राऊड फंडिंगमधून एवढ्या मोठ्याप्रमाणात पैसा गोळा केल्यानंतर वेदिकाला या आजारावर मात करण्यासाठी आवश्यक असणारं झोलगेन्स्मा नावाचं १६ कोटींचं इंजेक्शन एका खासगी रुग्णालयामध्ये देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही या आजाराने वेदिकाचा जीव घेतलाच.
वेदिकावर उपचार करण्यासाठी पैशांच्या रुपात मदत करणाऱ्यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आभार मानले होते. त्यांनी १६ जून रोजी “१६ कोटींचे इंजेक्शन वेदिका हिला दिल्यानंतर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या आई वडिलांसह आम्हा सर्वांच्या कष्टाचं आज चीज झालं याचं खरं तर मनाला समाधान वाटलं. वेदिकासाठी संकेत भोंडवे, माजी आमदार विलास लांडे तसेच ज्या ज्ञात आणि अज्ञात लोकांनी मदतीचा हात दिला, प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानले पाहीजेत. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर अशक्यप्राय गोष्ट शक्य होऊ शकते याचे हे जिवंत उदाहरण म्हणता येईल”, असं सांगत वेदिकासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले