शिये / वार्ताहर
निगवे दुमाला( ता. करवीर ) येथील संभाजी शंकर वळके यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी 40 तोळे सोने व रोख रक्कम 10 हजार रुपये असा सुमारे सोळा लाखांचा ऐवज लंपास केला. हि घटना काल बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान घडली. पुढील तपास करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की निगवे दुमाला येथील संभाजी वळके यांचे निगवे- वडणगे रस्त्यावर घर आहे. तसेच त्यांचे निगवे गाव भागातही घर आहे .त्यांच्या घरी पेशंट असल्यामुळे वळके कुटुंबीय हे गावातील घरांमध्ये गेले होते. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. वळके यांचे बंधू शिवाजी वळके यांच्या शेजारी असलेल्या घराला बाहेरील बाजूने जीना आहे. या जिन्यावरून चोरट्यांनी संभाजी बोडके यांच्या तिसऱ्या मजल्यावर प्रवेश केला. तिसऱ्या मजल्यावरील दार कटावणीने उचकटून दुसऱ्या मजल्यावर चोर आले. दुसऱ्या मजल्यावरून चोरटे खाली तळघरातील बेडरूममध्ये येऊन तिथे असलेली तिजोरी फोडून तिजोरीतील 40 तोळे दागिने व रोख रक्कम दहा हजार रुपये लंपास केले.