ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटात 257 जणांनी आपला जीव गमावला. तर सातशेपेक्षा अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या वाईट आठवणींचे घाव आजही मुंबईकरांच्या मनात कायम आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांकडून या स्फोटामागील मुख्य आरोपींचा शोध घेणे सुरु होते. अखेर अनेक देशांमधील शोध मोहिमेदरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. अबू बकरला UAE मधून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अबू बकर असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून त्याला लवकरच UAE मधून भारतात आणले जाणार आहे.
यासंदर्भातील वृत्त इंडिया टूडेने दिले आहे. अबू बकर पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्सचे लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. अखेर २९ वर्षांनी अबू बकर भारतीय यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.
लवकरच भारतात आणले जाणार?
अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. सन १९९७ मध्ये अबू बकर याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अबू बकरचे दुबईमधील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१९ मध्ये बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र, काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून, लवकरच भारतात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अबू बकर यांचे पूर्ण नाव अबू अब्दुल गफूर शेख आहे. दाऊदचे प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू तस्करीत सामील होता. त्याने आखाती देशांमधून सोने, कपडे आणि इलेक्रॉनिक्स वस्तूंची तस्करी मुंबईत केल्याचा आरोप आहे. सध्या अबूच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे.