कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून प्रचाराच्या निमित्ताने बड्या राजकीय नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. १२ एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने अनेक महाविकास आघाडी आणि भाजपचे बडे राजकीय नेते कोल्हापुरात येत्या दहा दिवसात पाहायला मिळणार आहेत.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्यावतीने काँग्रेसचे दिवंगत नेते चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्यावतीने ताराराणी चे गटनेते सत्यजित कदम हे रिंगणात आहेत. सध्या प्रचाराला जोर आला असून अनेक राजकीय बडे नेते कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत महा विकास आघाडी आणि भाजपच्या वतीने अनेक राजकीय नेते कोल्हापुरात दाखल होणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी 1 एप्रिल पासून झडणार आहेत.
महाविकास आघाडीकडून एक एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मिरजकर तिकटी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटी, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती त्यांच्या सभा होणार आहेत. तर येत्या दिवसात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची देखील सभा कोल्हापुरात नियोजित आहे.
तर भाजपकडून सत्यजित कदमांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत.