बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील सरकारी शाळांमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी कोरोना चाचणी केलेल्या गुलबर्गा येथील कलगी आणि बेंगळूरमधील एका अशा दोन सरकारी शाळांमधील बावीस मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही शाळा सात दिवस बंद असणार आहेत. दरम्यान दोन्ही शाळांमधील अन्य विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत.
चालू शैक्षणिक वर्षासाठी ६ वी आणि त्या वरील वर्ग पुन्हा सुरू झाल्यानंतर शाळा प्रथमच बंद ठेवल्या आहेत. १ जानेवारीपासून १० वी व १२ वीचे वर्ग पुन्हा सुरु झाले आहेत.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. राजशेखर माळी यांनी १ मार्च रोजी सुमारे २० विद्यार्थ्यांच्या गळ्यातील स्त्राव घेतल्याची माहिती दिली. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांचा अहवाल गुरुवारी कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंपाकी यांच्यासह सुमारे१७४ लोकांच्या गळ्यातील स्त्राव घेतले असून शनिवारी सायंकाळी हा अहवाल येणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.