बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जाहीर केले आहे की, नव्याने स्थापन झालेल्या कर्नाटक मंत्रिमंडळात आज भाजपचे एकूण २९ आमदार मंत्री म्हणून शपथ घेतील. ते म्हणाले, “एकूण २९ मंत्री आज दुपारी राजभवन येथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील.”
दरम्यान, महत्वाची बाब म्हणजे त्यांनी नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्याचा समावेश असणार नसल्याचे सांगितले. “गेल्या वेळी, येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आमच्याकडे तीन उपमुख्यमंत्री होते. यावेळी, हायकमांडने उपमुख्यमंत्री असणार नाही असा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी बेंगळूरमध्ये पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले की, नवीन मंत्रिमंडळाची यादी तयार आहे आणि ती राजभवनाला पाठवण्यात आली आहे. ते म्हणाले, २९ मंत्री आज दुपारी २:१५ वाजता शपथ घेणार आहेत. ओबीसी प्रवर्गातील ७, एससीचे ३, एसटीचे १, वोक्कलिगा समाजातील ७, लिंगायत समुदायाचे ८ आणि मंत्रिमंडळात १ महिला आहे.