वारणानगर / प्रतिनिधी
वारणानगर येथील वारणा साखर कारखान्याच्या शेतकरी कार्यालयात कामानिमित्त आलेले दिलीप बाबराव गायकवाड (रा. ऐतवडे बुद्रक ता. वाळवा ) यांची पडलेली ३० हजार रुपयांची रोख रक्कम कर्तव्यावर असणारे कारखान्याचे सुरक्षा विभागाचे सुरक्षा कर्मचारी अरूण शिवाजी कांबळे (रा. शहापूर ता. पन्हाळा) यांनी प्रामाणिकपणे परत दिल्याबद्दल त्यांचा वारणा साखर कारखाना व्यवस्थापनाकडून सत्कार करण्यात आला.
वारणा बँकेचे संचालक अरविंद्र बुद्रक यांच्यासह गायकवाड हे वारणा शेतकरी कार्यालयात कामानिमित आले होते. त्यावेळी गायकवाड यांच्या हातातील पैसे असणारी पिशवी दालनातच राहीली ही पिशवी कर्तव्यावर असणारे सुरक्षा कर्मचारी कांबळे यांना सापडली. त्यांनी पिशवी पाहली असता, त्यामध्ये रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान कांबळे यांनी तेथे काही वेळातच खात्री केल्यावर सदरची रक्कम संबंधित गायकवाड यांना परत दिली. यावेळी वारणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत, सचिव बी. बी. दोशिंगे, बँकेचे संचालक अरविंद बुद्रक, सुरक्षा अधिकारी शिवाजी पाटील आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अरुण कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून अभिनंदन केले.