कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने सीपीआर, इचलकरंजीतील आयजीएम आणि गडहिंग्लज उपजिल्हा ही आरक्षित हॉस्पिटल्स ५० टक्के नॉन कोरोना रूग्णांसाठी लवकरच खुली होणार आहेत. कोरोनामुक्तांसाठी ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना ओपीडी सुरू केली आहेत. कोरोना केअर आणि हेल्थ सेंटर बंद झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांना तात्काळ मुळ जागी कार्यरत राहण्याचा सुचना दिल्या आहेत. जिल्हा ९७ टक्के कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा प्रशासनाने नॉन कोरोना रूग्णांसाठी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे शासकीय हॉस्पिटल्स लवकरच नॉन कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी खुले होण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून सीपीआर हॉस्पिटल, इचलकरंजीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालय कोरोना रूग्णांसाठी आरक्षित केले होते. तेथे अन्य रूग्णांवर उपचारास प्रतिबंध केला होता. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कम्युनिस्ट स्पेड झाला, त्यावेळी जिल्ह्यात शंभरांहून अधिक ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार सुरू होते. डीओटी, हेल्थ सेंटर, केअर सेंटरमध्ये संशयित, बाधित रूग्णांवर उपचार सुरू झाले. त्याचे सकारात्मक परिणाम म्हणजे ऑक्टोबरमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली. ऑक्टोबरअखेर कोरोनामुक्तांची संख्या ९७ टक्क्यांवर पोहोचली आहे.
कोरोनाकाळात गेली 7 महिने को-मॉर्बीड रूग्णांची कोंडी झाली होती. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, किडनीविकार आदी रूग्णांना नियमित उपचारासाठी टेलिमेडीसीनचा आधार घ्यावा लागला. आता ऑक्टोबर हीट संपली आहे. थंडीला सुरूवात झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीही सुरू केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत यावर निर्णयही घेण्यात आले. नॉन कोरोना रूग्णांना शासकीय हॉस्पिटल्समध्ये उपचार मिळण्यासाठी पावले उचलली आहेत.
कोरोनासाठी आरक्षित सीपीआर हॉस्पिटल, आयजीएम हॉस्पिटल इचलकरंजी आणि गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय येथील ५० टक्के वॉर्ड नॉन कोरोना रूग्णांसाठी लवकरच खुले होत आहेत. शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथील अल्फान्सो स्कूल आणि पेरीड येथे कोरोना केअर सेंटर सुरू होती. त्यापैकी करंजोशी येथील केअर सेंटर बंद झाले आहे. पेरीड येथील केअर सेंटर पुढील आदेशापर्यत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोना रूग्ण नसल्याने सर्व इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन केंद्रे बंद करण्यात येत आहेत.
शहर व परिसरातील कोरोना रूग्णांसाठी शिवाजी विद्यापीठातील डीओटी सेंटर सुरू राहणार आहे. पण दोन वसतीगृहातील केअर सेंटर बंद झाली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, पर्यायाने बाधित, संशयित रूग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोना हेल्थ सेंटर, केअर सेंटर बंद केली आहेत. इन्स्टिट्यूशनल केंद्रेही बंद झाली आहेत. तरीही संभाव्य लाटेचा धोका पाहता कोरोनामुक्त व संभाव्य रूग्णांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालयात कोरोनासाठी बाहÎ रूग्ण विभाग तत्काळ सुरू करण्याचा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.
सीपीआरमध्ये जुन्या इमारतीत कोरोना वॉर्ड, ओपीडी सेंटर सुरू राहणार
सध्या सीपीआरमध्ये दीडशेच्या आसपास कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. सीपीआरच्या जुन्या अपघात विभागात कोरोना ओपीडी सुरू आहे. त्यामुळे जुन्या इमारतीतील वॉर्ड सुरू ठेवून अन्य इमारती नॉन कोरोना रूग्णांसाठी वापरणे शक्य आहे. त्यादृष्टीने अन्य इमारतींच्या सॅनिटायझेशनचा निर्णय सीपीआर प्रशासन लवकरच घेणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याच्या आरोग्य संचालकांनीही यासंदर्भात हॉस्पिटल प्रशासनाला सुचना केल्या आहेत.
आयजीएम, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले होणार
सार्वजनिक आरोग्य विभागाशी निगडीत इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटल आणि गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात ५० बेड हे नॉन कोरोना रूग्णांवर उपचारासाठी खुले करण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होत आहे. फक्त सीपीआर हॉस्पिटलमध्ये ५० टक्के हॉस्पिटल नॉन कोरोना रूग्णांसाठी कसे खुले करायचे, यासंदर्भात नियोजन अन् हालचाली सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.