मुंबईतून एका महिलेस अटक, खेड पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / खेड
कमी किंमतीत सोन्याचे दागिने देण्याच्या आमिषाने चौघांना चाकूचा धाक दाखवत ५९ लाखांची रोकड लूटणाऱ्या टोळीतील १२ जणांच्या अटकेनंतर आणखी एका महिलेस येथील पोलिसांनी गजाआड केले आहे. लुटीतील साडेबारा लाखांची रोकड या महिलेच्या घरातून येथील पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पुढे आली आहे. दिपाली स्वप्निल मोहिते ( मुंबई-अँन्टॉपहील ) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.
महामार्गावरील उधळे कामाक्षी पेट्रोलपंपानजीकच्या जंगलात १६ सप्टेंबर रोजी घडलेल्या ५९ लाखांच्या लूटप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना गजाआड केले आहे. यामध्ये मुख्य सूत्रधाराचाही समावेश आहे. लुटीतील मुख्य सूत्रधार किशोर पवार याने काही रोकड मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या दिपाली मोहिते या बहिणीकडे साडेबारा लाखांची रोकड ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही रोकड हस्तगत करण्यासाठी सापळा रचला.
अखेर पोलिसांनी दिपाली मोहिते या महिलेस शिताफीने जेरबंद करत तिच्या घरातून साडेबारा लाखांची रोकड हस्तगत केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत लूटप्रकरणातील ४८ लाखांचा ऐवज जप्त केला असून उर्वरित रोकडही लवकरच हस्तगत करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की करत आहेत.