कोल्हापूर / प्रतिनिधी
खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विविध ठिकाणी ॲड. सदावर्ते यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर नाशिकमध्ये सदावर्ते यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.
कोल्हापुरात प्रतिमेचे दहन
सदावर्ते यांचा कोल्हापुरात निषेध करण्यात आला. उत्तरेश्वर पेठेतील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदावर्ते यांच्या प्रतिमेचे प्रतीकात्मक दहन करून निदर्शने केली. यावेळी उत्तरेश्वर पेठेतील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातही पडसाद
दरम्यान, सदावर्ते यांच्या विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. पुणे येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करून निषेध नोंदवला. तसेच त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या.
नाशिक मध्ये गुन्हा नोंद
नासिक मध्ये ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीने हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.